कुरुंदवाड : येथील प्रभाग तीनमधील विकासकामे खोळंबल्याच्या निषेधार्थ नगरसेवक शरद आलासे यांनी पालिकेसमोर उपोषण केले. त्यातच अपुऱ्या पाण्याच्या प्रश्नावरून पालिकेवर आलेला महिलांचा घागर मोर्चा उपोषणस्थळी थांबल्याने पालिका पदाधिकारी संतापले. यावेळी नगराध्यक्ष संजय खोत, गटनेते रामचंद्र डांगे, बांधकाम सभापती सुरेश कडाळे उपोषणस्थळी आले. त्यांनी उपोषणकर्ते आलासे यांना लोकांची दिशाभूल करीत पालिकेला बदनाम करीत असल्याचा आरोप करीत धारेवर धरले. यावेळी वादावादी होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता. पदाधिकारी निघून जाताच उपोषणकर्त्यांनी निर्णयाविना उपोषण मागे घेतले. प्रभाग तीनमधील विविध कामे खोळंबल्याचा व तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत नगरसेवक आलासे पालिकेसमोर सकाळी उपोषणाला बसले. त्याचवेळी या प्रभागातील महिलांनी पाणीप्रश्न गंभीर बनल्याने पालिकेवर घागर मोर्चा काढला. मात्र, मोर्चा पालिकेवर न जाता उपोषणस्थळीच थांबल्याने उपोषणकर्त्यांना पाठबळ मिळाले. पालिकेविरोधात आंदोलन होत असल्याने नगराध्यक्ष खोत, नगरसेवक डांगे, बांधकाम सभापती कडाळे, उपोषणस्थळी आले. मागण्यांच्या निवेदनामध्ये पाण्याचा प्रश्न नसताना मोर्चातील महिलांची दिशाभूल करीत पालिकेची बदनामी करीत असल्याचा आरोप डांगे यांनी आलासे यांच्यावर केला. यावेळी दोन्ही समर्थकांतून वादावादी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. त्यांनतर आपल्या मागण्यांबाबत आठ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगत उपोषणकर्त्यांनी माघार घेतली. यावेळी आंदोलनात दिलावर कोठावळे, कृष्णात लोकरे, दस्तगीर पोलाद, महावीर चौगुले, जबेदर पाथरवट, दौलतबी पोलाद, बंडू उमडाळे, आदी सहभागी झाले होते.
कामे खोळंबलेच्या निषेधार्थ उपोषण
By admin | Updated: March 17, 2015 00:12 IST