कुरुंदवाड : शेतकऱ्यांनी शेतीबाबत मर्यादा न पाळल्याने क्षारपड जमिनीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी तालुक्यात क्षारपडमुक्त मोहीम सुरू केली आहे. ही जमीन पुनर्निर्माणाची चळवळ म्हणून यशस्वी करण्याची गरज आहे. ती पुढे नेण्यासाठी शेतकऱ्यांनी गट, तट, राजकारण विसरून या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले.
हेरवाड (ता. शिरोळ) येथे दत्त साखर कारखान्याच्यावतीने सुमारे २५५ एकर जमीन क्षारमुक्त करण्याच्या कामास संपादक भोसले यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच सुरगोंडा पाटील होते. उद्यानपंडित गणपतराव पाटील, वसंतराव हंकारे प्रमुख उपस्थित होते. वसंत भोसले म्हणाले, संपन्न शेतीतून एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेऊन आर्थिक सुबत्ता मिळविली असली तरी भाजीपाला घेण्यासाठी बाजारात फिरणे हे शेतकऱ्यांचे अपयश आहे. शेतीला कमीपणा आणण्यात आला आहे. मात्र, तरुणांनी शेती करणे कमीपणा समजू नये. निसर्ग वाचविण्यासाठी निसर्गाचा समतोल साधण्याची गरज आहे. आता निसर्ग वाचविण्याची वेळ आली आहे. त्यात आपण अपयशी ठरलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असा सावध इशारा देत शेती पुनर्निर्माण चळवळीत तरुणांना सहभागी करून घेतल्यास ही चळवळ अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, क्षारपड जमीन सुधारणा योजनेसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये चांगले उत्पन्न घेऊन कर्जफेड करून कर्जमुक्त झाले आहेत. क्षारपडमुक्ती चळवळीसाठी शेतकऱ्यांना लागेल ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी वसंतराव हंकारे, सरपंच पाटील, दामोदर सुतार, दगडू माने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, अशोक शिंदे, श्रीशैल हेगान्ना, प्रा. मोहन पाटील, राजेंद्र आलासे, गिरीष पाटील, दादा पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो - १३०४२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - हेरवाड (ता. शिरोळ) येथे जमीन क्षारपडमुक्त कार्यक्रमात 'लोकमत'चे संपादक वसंत भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वसंतराव हंकारे, गणपतराव पाटील, सरपंच सुरगोंडा पाटील आदी उपस्थित होते.