पुसेगाव : उंबरमळे व कातळगेवाडी (ता. खटाव) येथे फऱ्या रोगाचा मोठा फैलाव झाला आहे. अचानक आलेल्या या रोगाने परिसरातील खिलार, जर्सी गाई, म्हशी, खिलार बैल अशा २७ जनावरांचा मृत्यू झाला असून, शेतकऱ्यांचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या हलगर्जीपणामुळे रोगाचा फैलाव झाल्याचा आरोप करीत संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी उंबरमळेचे सरपंच नवनाथ वलेकर यांनी केली आहे. उंबरमळे येथील केशव अप्पाजी वलेकर यांची एक खिलार व जर्सी गाय, युवराज माधव वलेकर यांची जर्सी गाय, रामचंद्र बाबा वलेकर यांचा बैल, संदीप शंकर पाटोळे यांची जर्सी गाय, लक्ष्मण मामा पाटोळे यांची खिलार गाय, शंकर संपत गोफणे यांची म्हैस, बाबा वसंत वलेकर यांच्या दोन म्हशी, श्रीमंत माधव वलेकर यांची जर्सी गाय, मंदा भीमराव वलेकर यांची जर्सी गाय, कातळगेवाडी येथील पांडुरंंग ज्ञानू जाधव यांची खिलार गाय, दादा शामराव जाधव यांचे खिलार खोंड, अंकुश राजाराम भारती, संतोष देवबा जाधव, कमल पोपट जाधव, दत्तात्रय विठ्ठल जाधव, प्रदीप लक्ष्मण जाधव यांची प्रत्येकी एक जर्सी कालवड, दादासाहेब बाबूराव जाधव, दादा हरिबा जाधव, नारायण दिनकर जाधव यांचे प्रत्येकी एक खिलार खोंड अशी २७ जनावरे दगावली. घटनेचे गांभीर्य ओळखून पशुसंवर्धन विभागाने उंबरमळे व कातळगेवाडी येथे तातडीने जनावरांचे लसीकरण केले. मात्र, हीच खबरदारी योग्य वेळी घेतली असती तर नुकसान टळले असते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाच्या लहरीपणामुळे खटाव तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय प्राधान्याने केला जातो. फऱ्या रोगाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. (वार्ताहर)खबरदारी न घेतल्यानेच...पावसाळा सुरू होण्यापूर्वी राज्य शासन व प्रशासन जनावरांच्या लसीकरणासह विविध मोहीम राबविते. मात्र, पशुसंवर्धन विभागाने पावसाळ्यापूर्वी योग्य खबरदारी न घेतल्याने फऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन २७ जनावरे दगावल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
फऱ्या रोगाने २७ जनावरांचा मृत्यू
By admin | Updated: July 1, 2015 00:17 IST