तानाजी घोरपडे - हुपरी -जागतिक बाजारातील मोठ्या प्रमाणातील मंदीचे वातावरण, उद्योग निर्मात्यांकडून घटलेली मागणी, चीनमधील बाजारपेठेत शेअरमध्ये झालेली प्रचंड घसरण, ग्रीसमधील आर्थिक राजकीय संकट या सर्व घटनाक्रमामुळे आशियाई बाजारामध्ये चांदीच्या दरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्याप्रमाणात घसरण सुरू आहे. गेल्या पाच वर्षांतील दर नीचांकी पातळीवर गेल्याने रौप्यनगरीतील व्यवहार ठप्प झाले आहे आहेत.सन २०१३ मध्ये ऐतिहासिक अशा ७२ हजार प्रतिकिलो दराचा विक्रम निर्माण करणारा चांदीचा भाव आज केवळ ३४ हजारांच्या घरात आहे. परिणामी या व्यवसायातील खरेदी-विक्रीचे व चांदी आयात-निर्यातीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प होत आहेत. चांदीच्या दरामध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात घसरण होत राहिल्याने रौप्यनगरी हुपरी परिसरातील संपूर्ण चांदी उद्योगामध्ये मंदीचे वातावरण पसरले गेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीचा सर्वांत जास्त परिणाम हा चांदीच्या दरावर होत असतो. संपूर्ण जगामधील विविध उद्योगांमध्ये प्रतिवर्षी सुमारे ७ हजार ५०० टन चांदी वापरली जाते. धनाढ्य शक्ती व सट्टेबाजांकडून या संधीचा गैरफायदा उठविण्यासाठी चांदीची संपूर्ण बाजारपेठच हायजॅक करण्याच्या घटना वेळोवेळी घडत असतात. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांनी जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेले मंदीचे वातावरण, अमेरिकेची कोलमडलेली अर्थव्यवस्था, विविध उद्योगांकडून घटलेली मागणी, चीनमधील शेअर बाजारातील प्रचंड घसरण, ग्रीसमधील आर्थिक, राजकीय संकट या सर्व घडामोडींचा विपरीत परिणाम आशियाई बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पहावयास मिळत आहे. भारतातील सराफ बाजाराचा कल ठरविणाऱ्या सिंगापूरमधील बाजारातही चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने बुधवारी सुमारे १५५० रुपयांनी चांदीचा भाव कमी होऊन तो ३४,४५० रुपये झाला. भावातील अशाप्रकारची घसरण पाहून स्थानिक पातळीवरील दागिने निर्माते आणि किरकोळ खरेदीदारांनीही आपले हात आखडते घेतल्याचे पहावयास मिळत आहे. औद्योगिक क्षेत्रातील मंदीचे वातावरण, नाणी उत्पादकांकडून चांदीच्या मागणीचा ओसरलेला जोर, जागतिक मंदीच्या वातावरणाचा परिणाम म्हणून सट्टेबाजांनी थांबविलेली खरेदी-विक्री आदी घडामोडींमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत घसरण थांबणार नाही तसेच चीन व ग्रीसमधील वातावरणामध्ये बदल अपेक्षित आहे. आणखी घसरणारसन २०१३ मध्ये चांदी उद्योगाच्या इतिहासामध्ये उच्चांक निर्माण करणारा ७२ हजाराचा भाव आज केवळ ३४ हजाराच्या घरात खेळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये चांदीचा भाव आणखीन घसरणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घसरण रौप्यनगरीच्या मुळावर
By admin | Updated: July 9, 2015 21:29 IST