लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे कोल्हापूर शहरातील बंद असलेल्या भाजीमंडईमुळे भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. वांगी, ढब्बू, कारली, भेंडीसह प्रमुख भाज्यांचे दर घाऊक बाजारात दहा ते पंधरा रुपये आहेत.
व्यापाऱ्यांसह स्थानिक शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची आवक सध्या सुरू आहे. त्यात शहरातील भाजीमंडई व आठवडी बाजार बंद असल्याने रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. आवकेपेक्षा मागणी कमी असल्याने दरात घसरण झाली आहे. रविवारी घाऊक बाजारात कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, कारली, भेंडी व दोडक्याचे दर दहा ते पंधरा रुपये किलोपर्यंत आहेत. एरव्ही ४० रुपयांच्या वर असणारी गवार वीस रुपयांवर, तर वरणा ३२ रुपयांपर्यंत खाली आला आहे. कोथिंबीरची रोज ५४ हजार पेंढ्यांची आवक झाली आहे. त्यामुळे पेंढीचा दर सरासरी सात रुपये आहे. मेथी नऊ, पालक व पोकळा तीन रुपये पेंढी असा दर आहे.
घरपोहोच भाजीपाला पुरवठ्यावर मर्यादा
घरपाेहोच भाजीपाला पुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. दारात जाऊन भाजी द्यायची असल्याने पैसे अधिक मोजावे लागतात. त्यामुळे घरपाेहोच भाजीपाला खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसत नाही.
सात ते अकरा वेळेत खरेदी करायची की विक्री
भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी सकाळी सात ते अकरा ही वेळ दिली आहे. बाजार समितीमधून भाजीपाल्याची खरेदी करून ते विक्रीच्या ठिकाणी जायचे कधी? आणि त्याची विक्री करायची कधी? असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. अवघ्या चार तासांत खरेदी-विक्रीची प्रक्रिया पूर्ण करणे अवघड असल्याने भाजीपाला शिल्लक राहत असल्याने व्यापारी खरेदीचे धाडस करीत नाहीत.