लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने स्थानिक भाजीपाल्याची आवक काहीशी वाढली असून, दरात थोडी घसरण झाली आहे. वांगी, घेवडा, गवार, कारली, वरणा, दोडक्याचे दर तुलनेत कमी झाले आहेत. कडधान्य मार्केट एकदम शांत असून, सरकी तेल, साखरेच्या दरातही फारसा चढउतार दिसत नाही. ओल्या भुईमूग शेंगाची आवक चांगली असून, घाऊक बाजारात ३२ रूपये किलो दर मिळत आहे.
पंधरा दिवस पावसाने उसंत घेतल्याने स्थानिकसह सांगली, कर्नाटकात भाजीपाल्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीत भाज्यांची आवक तुलनेत वाढली आहे. आता पावसाची सुरुवात झाली असली तरी त्याचा आवकेवर लगेच परिणाम होत नाही. वांगी, घेवडा, गवार, कारली, वरणा, दोडका, वालची आवक काहीशी वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात वांगी २२, घेवडा २०, गवार ३०, कारली २०, दोडका १७ तर वाल दर ३५ रूपये किलो राहिला आहे. किलोमागे साधारणत: पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटो, ढब्बू, भेंडीचे दर स्थिर राहिले आहेत. पालेभाज्यांची आवक वाढल्याने घाऊक बाजारात दर निम्म्यावर आले आहेत. गेल्या आठवड्यात दहा रुपये असणारी मेथी साडेसहा रुपयाला झाली आहे. पालक साडेसहा रुपयांचा साडेतीन रुपये तर पोकळा सहा रुपयांचा पाच रुपये झाला आहे. शेपूच्या दरात एकदमच घसरण झाली असून, नऊ रुपये पेंढीवरुन अडीच रुपये दर झाला आहे. बाजार समितीत कोथिंबीरची आवक रोज ६८ हजार पेंढ्या होत आहे. त्यामुळे दर शेकडा ६५० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
फळ मार्केटमध्ये तोतापुरी आंबा व अननसची आवक वाढली कायम आहे. पेरु, डाळींब, सफरचंदाचीही रेलचेल आहे.
कांदा, बटाटा स्थिर
कांद्या, बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात फारसा चढ-उतार दिसत नाही. बटाटा घाऊक बाजारात १३ रूपये तर किरकोळमध्ये २० रूपये किलोपर्यंत आहे. कांदाही १५ ते २० रुपये किलो आहे. लसूण दर ६० रूपये किलो राहिला आहे.
फोटो ओळी : जिल्ह्यात ओल्या भुईमूग शेंगांची आवक चांगली आहे. रविवारी भाजी मंडईत टपोऱ्या शेंगांना मागणीही अधिक राहिली. (फोटो-११०७२०२१-कोल- बाजार) (छाया- नसीर अत्तार)