इचलकरंजी : मुंबईतील एका कंपनीच्या नावाने तयार केलेला धनादेश येथील सेंट्रल बॅँक आॅफ इंडिया, इचलकरंजी शाखेमधून रत्नाकर बॅँक लि. शाखा इचलकरंजीकडे समाशोधन (वटवण्या) साठी आला. बॅँकेतील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आठ लाख ७५ हजार ३९७ रुपयांचा हा धनादेश बनावट असल्याचे उघडकीस आले. याची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित खातेदाराविरोधात फसवणूक तसेच बनावट दस्तऐवजाद्वारे गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.रत्नाकर बॅँकेच्या येथील शाखेत समाशोधनचे काम सुरू होते. यावेळी सोएक्स इंडिया प्रा.लि. या कंपनीच्या नावाचा आठ लाख ७५ हजार ३९७ रुपयांचा धनादेश अमिता श्रीपत कामदे यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आला. बॅँकेचे नेहमीचे धनादेश व या धनादेशामध्ये तफावत आढळल्याने कर्मचारी सचिन मगदूम यांनी हा धनादेश व्यवस्थापक राहुल खोत यांना दाखविला. त्यावर व्यवस्थापक खोत यांनी संबधीत धनादेश ई-मेलद्वारे मुंबई शाखेकडे पाठवून खात्री झाल्यानंतर हा धनादेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. खोत यांनी येथील पोलीस ठाण्यात अमिता श्रीपत कामदे याच्याविरोधात तक्रार दिली आहे. (प्रतिनिधी)
बनावट धनादेशाद्वारे पावणेनऊ लाखांच्या फसवणुकीचा प्रयत्न
By admin | Updated: December 24, 2014 00:18 IST