पाचगाव : मोरेवाडी (ता. करवीर) ग्रामपंचायत हद्दीतील आर. के. नगर दक्षिणेकडील भोसलेनगर, धन्वंतरी कॉलनी व मगदूम कॉलनीमध्ये नागरी सुविधांचा अभाव असल्याने येथील रहिवाशांना अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे. अष्टविनायक नगर या नावाने परिचित असलेल्या या तिन्हीही कॉलन्यांकडे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. मोरेवाडी-आर. के. नगर हे शहरालगत असल्याने या ठिकाणी अनेक कॉलन्यांचा विस्तार होऊन लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. येथून कोल्हापूरमध्ये नोकरी व कामासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. याचठिकाणी अष्टविनायक पार्क आहे. त्याठिकाणी १७० ते २०० कुटुंबे राहतात. याठिकाणी कचरा कोंडाळ्याचा अभाव, सांडपाणी निर्गतीकरण, रस्ते, गटर्स, पिण्याचे पाणी, अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकवेळा येथील रहिवाशांनी याची माहिती निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीला कळवूनसुद्धा त्याकडे कानाडोळा केला जात आहे. लोकप्रतिनिधी मते मागायला दारात येतात. परंतु, लोकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. कॉलनीअंतर्गत रस्ते व गटारी खराब आहेत. भारती विद्यापीठाच्या मागील बाजूस ग्रामपंचायतीने उठाव केलेला कचरा टाकला जात असल्याने परिसरात त्याची दुर्गंधी पसरत पावसाळ्यात त्या कचऱ्याच्या ढिगातील घाण व पाणी डोंगर उताराने कॉलन्यांत पसरते. कॉलनीमध्ये गटारांची व रस्त्यांची व्यवस्था नसल्याने हे पाणी सरळ लोकांच्या दारातच येऊन डबकी साचून राहतात. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढते व अनेक आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. सहा महिन्यांपूर्वी येथील एका तरुणीला डेंग्यू झाल्याने तिच्यावर अद्यापही उपचार चालू आहेत. त्यामुळे येथील लोकांचा आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ग्रामपंचायतीकडून ज्या ठिकाणी कचरा साठवला जातो, त्याच ठिकाणी भारती विद्यापीठ आहे. या ठिकाणी अनेक भागातून विद्यार्थी येतात. त्यांची संख्या सुमारे ३००० च्या वर आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणांहून जाताना नाकाला रुमाल लावूनच जावे लागते. दिवसभर कॉलेजच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली असते. भारती विद्यापीठाच्या प्राचार्यांनी अनेकवेळा संबंधित प्रशासनाला कळविले असूनदेखील त्याकडे लक्ष दिले जात नाही. या परिसरातील नागरिकांना कायमच पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. या भागात असणाऱ्या दोन बोअर दुरुस्तीअभावी बंद आहेत. सध्या पाणी अवेळी सोडण्यात येते. तसेच अनेक ठिकाणी कच्चे रस्तेसुद्धा झालेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात लोकांना खाच-खळग्यांशी सामना करावा लागतो. असे एक ना अनेक प्रश्न ग्रामपंचायतीला माहिती असूनसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे मत स्थानिक रहिवाशांतून व्यक्त केले जात आहे. याकडे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहण्याची मागणी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. या सुविधा पाहिजेत... ४पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी ४कॉलनीतील रस्ते व गटारी सुस्थितीत करण्यात याव्यात ४मोरेवाडीतून प्रवेश करण्यासाठीचा रस्ता ५०० मीटरने जोडावा लागत असल्याने तो प्राधान्याने पूर्ण करावा. रस्त्याअभावी लोकांना शाळा, दवाखाना, बस व बाजारासाठी तीन किलोमीटर फिरून जावे लागत आहे. ४पावसाळ्यात रस्त्यावर वाढणारे गवत व झुडपे वेळोवेळी काढण्यात यावीत. पथदिव्यांची सोय करावी. ४कचरा उठावाची घंटागाडी प्रत्येक कॉलनीत नियमित पाठवावी. ४भारती विद्यापीठामागे माळरानावर टाकण्यात येणारा कचरा इतरत्र टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी १४ वर्षांपासून अष्टविनायक पार्क असुविधेच्या गर्तेत सापडला आहे. अनेकवेळा ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाला कळवूनही उपाय योजना केल्या जात नाहीत. प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन करु - चंद्रकांत बराले, जिल्हाध्यक्ष हिंदू एकता आंदोलन ग्रामपंचायत व प्रशसनाच्या दुर्लक्षांमुळे येथील लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. - जालंदर मेढे, नागरिक. अष्टविनायक पार्क येथील रस्ते व स्ट्रीटलाईटचा प्रश्न मार्गी लावला आहे. कचरा जागेअभावी तेथे टाकण्यात येतो. परंतु कचरा व्यवस्थापनासाठी त्याच ठिकाणी २० फुट खड्डा काढून विल्हेवाट लावावी जाईल त्यासाठी तहसिलदारांकडे मागणी केली आहे. शासनाने परवानगी दिल्यावर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावू. - अमर मोरे, ग्रामपंचायत सदस्य.
अष्टविनायक नगरमध्ये सुविधांचा बोऱ्या
By admin | Updated: July 4, 2016 00:40 IST