सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघात आकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी प्रचाराचा धुरळा उडत आहे. वडगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, कासारी व मांगनूरमध्ये बिनविरोधसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले, पण अखेर याठिकाणी ही काही प्रभागांसाठी निवडणूक लागली. येथे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले तर पाच जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वपक्षीय आघाडीविरुद्ध अपक्ष अशी लढत होत आहे.
हसूर खुर्द, आलाबाद, तमनाकवाडा , माद्याळ, बेलेवाडी मासा, बोळावी वाडी, कासारी आदी गावात थेट दुरंगी लढत होत आहे. तमनाकवाडा येथे मुश्रीफ गटात फुट पडली असून, सरपंच दत्तात्रय चव्हाण यांनी समरजित घाटगे गटासोबत युती केली आहे. येथे मुश्रीफ-मंडलिक-संजय घाटगे यांची युती आहे. हसुरमध्येही मुश्रीफ गटात दोन गट पडले आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे विश्र्वासू तालुका संघाचे संचालक अंकुश पाटील यांनी स्वबळावर पॅनल केले आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. या जोरावर अंकुश पाटील निवडणुकीस सामोरे जात आहेत. त्यांच्याविरोधात मंडलिक-मुश्रीफ-समरजित घाटगे-संजय घाटगे-मुश्रीफ यांनी आघाडी केली आहे.
आलाबाद मध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर जे. डी. मुसळे यांनी पॅनल केले असून, याठिकाणी मुश्रीफ-मंडलिक याची युती आहे .कासारी व मांगनूरमध्ये सर्वपक्षीय विरुद्ध अपक्ष अशी लढत होत आहे. एकूणच चिकोत्रा खोर्यात स्थानिक पातळीवर सोयीस्कर अशा अघाड्या उदयाला आल्या आहेत.