कोल्हापूर : शहरातील दक्षिणेकडील उपनगरांना शुद्ध पाणीपुरवढा करणाऱ्या पुईखडी जलशुद्धिकरण केंद्राची बोगसगिरी शुक्रवारी गटनेता शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी उघड केली. यंत्रणा कार्यान्वित करून पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी नगरसेवकांनी केंद्रातच तीन तास ठिय्या आंदोलन के ले. याबाबत लेखी आश्वासन घेतल्यानंतरच आंदोलनातून माघार घेण्यात आली. जलअभियंता मनीष पवार यांना विभागाच्या बोगस कारभाराबाबत नगरसेवकांनी जाब विचारत धारेवर धरले.शहरासाठी शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांतून रोज १२० ते १३० दशलक्ष लिटर्स (एमएलडी) पाण्याचा उपसा होतो. कसबा बावडा वगळता शिंगणापूर व पुईखडी केंद्रातील यंत्रणा कुचकामी असल्याने तत्काळ दुरूस्तीची मागणी वारंवार नगरसेवकांनी केली. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने नगरसेवकांनी पुईखडी केंद्राजवळ ठिय्या आंदोलन करत यंत्रणेची झाडाझडती घेतली. त्यामुळे जलविभागाची भंबेरी उडाली.केंद्रातील क्लोरिफायर यंत्रणा बंद आहे. अंदाजे क्लोरिन टाकत महापालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. पाणी उपसा करणाऱ्या आठ मोटार पंपांपैकी दोन पंप जागेवर नाहीत. इलेक्ट्रीक यंत्रणा मोडकळीस आली आहे. हे नगरसेवकांच्या पाहणीनंतर पुढे आले. या सर्व दुरूस्त्या करून पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी नगरसेवकांनी तीन तास केंद्रातच ठिय्या मारला. उपायुक्त विजय खोराटे यांनी नगरसेवकांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. केंद्रातील यंत्रणेचा पंचनामा केल्याने हबकलेल्या जलविभागाच्यावतीने उपायुक्त विजय खोराटे यांच्या सहीने या सर्व दुरूस्त्या एका महिन्यात करत असल्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर नगरसेवकांनी माघार घेतली. आंदोलनात गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक जितू सलगर, मधुकर रामाणे, महेश जाधव, आदींंसह नागरिक सहभागी झाले.
पुईखडी जलशुद्धिकरण केंद्रातील बोगसगिरी उघड
By admin | Updated: July 18, 2015 00:19 IST