मलकापूर - गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पाऊस व वाऱ्यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील गोगवे गावच्या हद्दीत वडाचे भले मोठे झाड पडल्यामुळे महामार्गावरची तीस तास वाहतूक बंद होती. तर पावसामुळे तालुक्यातील वारणा, कडवी, कासारी या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.
तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे गोगवे गावच्या हद्दीत महामार्गावर वडाचे झाड पडून वाहतूक तीन तास बंद होती. तीस तासांनंतर जेसीबी मशिनच्या साह्याने झाड बाजूला करण्यात आल्यावर वाहतूक सुरू झाली. पावसामुळे डोंगर कपारीतील ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. तर शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मृग नक्षत्राच्या तोंडावर शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी केली आहे. भावाची उगवण चांगली झाली आहे. निळे-करुगळे रस्त्यावर गटारी नसल्यामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. आंबा, उदगिरी, विशाळगड परिसरातील भागात जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे नद्या, नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत.
फोटो
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर गोगवे गावच्या हद्दीत वडाचे झाड पडल्यामुळे वाहतूक बंद होती.