विद्यमान नगरसेवक -- अनुराधा सचिन खेडकर
मागील निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना पडलेली मते --
१) अनुराधा खेडकर -- २०८२ (राष्ट्रवादी)
२) शिवानी संजय पाटील -- १३८९ (भाजप)
३) इंद्रायणी युवराज खंडागळे -- ४५४ (काँग्रेस)
आताचे आरक्षण -- सर्वसाधारण
प्रकाश पाटील
कोपार्डे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा प्रभाग क्रमांक ५१, लक्षतीर्थ वसाहत हा प्रभाग यंदा सर्वसाधारण झाल्याने या मतदारसंघात सर्वच पक्ष ताकदीने निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षतीर्थ वसाहतीवर साऱ्या शहराचे लक्ष असणार आहे.
प्रभाग क्रमांक -- ५१ वर गेल्या २५ वर्षांपासून खेडकर कुटुंबाचे प्राबल्य राहिले आहे. या कुटुंबातील व्यक्तीच नगरसेवक म्हणून निवडून गेल्या आहेत. त्यामुळे यंदाही खेडकर कुटुंबच निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहणार आहे. यंदा हा प्रभाग खुला झाला असून खेडकर कुटुंबीय कोणाला रिंगणात उतरवणार, याची उत्सुकता आहे. आनंदराव खेडकर (तात्या), त्यांच्यानंतर पत्नी, मुलगा सचिन खेडकर व सध्याच्या नगरसेविका अनुराधा खेडकर अशी विजयाची परंपरा खेडकर कुटुंबियांनी ठेवली आहे.
मागील निवडणुकीत अनुराधा खेडकर यांनी २०८२ मते घेत विजय मिळवला होता. यावेळी भाजप-ताराराणी आघाडीच्या शिवानी संजय पाटील यांनी १३८९ मते घेतली होती. काँग्रेसच्या इंद्रायणी युवराज खंडागळे यांना ४५४ मते मिळाली होती.
सध्या आनंदराव खेडकर यांचा मुलगा सचिन व पुतण्या भैया खेडकर हे राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी दावेदार असणार आहेत, तर काँग्रेसकडून अविनाश पाटील, दीपक पाटील हे उमेदवारी मागणीच्या तयारीत आहेत. या प्रभागातून गणेश खाडे यांनीही चाचपणी सुरू केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षतीर्थ वसाहत या प्रभागातील निवडणूक रंगण्याची शक्यता आहे.
कोट
हा भाग तसा मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी व शेती व्यवसायाशी संबंधित आहे. विशेषतः आता येथे २० कॉलन्या झाल्या आहेत. आजही शेतीला प्राधान्य येथे दिले जाते. यामुळे मूलभूत सुविधा देताना सर्वांचा विचार करून विकासाला प्राधान्य दिले आहे. नगरोत्थानमधून ७५ टक्के विकास साधला आहे. यात रस्ते, गटार, पथदिवे, प्राथमिक शाळा नूतनीकरण याबाबत प्राधान्य दिले आहे.
- अनुराधा खेडकर (विद्यमान नगरसेविका).
प्रभागातील झालेली कामे...
पथदिवे एलईडी, अण्णासो शिंदे व यशवंतराव शिंदे प्राथमिक शाळा इमारत नूतनीकरण, नगरोत्थानमधून निधी वापरून ७५ टक्के कामे पूर्ण. हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्याकडून दत्तनगर, नर्मदा पार्क, राऊत मळा, व्यंकटेश कॉलनी रस्त्यासाठी ४५ लाखांचा निधी मिळाला.
अपुरी कामे...
आरक्षित जागेवर शाळा झाल्याने मैदान नाही, डीपी रोडचा प्रश्न १५ वर्षे रखडला आहे. सांस्कृतिक हॉल नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज.
फोटो २५ प्रभाग क्रमांक ५१
डीपी रोडचे रखडलेले काम.