कोल्हापूर : प्रत्येक स्त्री आई, सून, सासू, बहीण, बायको आणि मैत्रीण या भूमिकेत राहून आपल्यापरीने सर्वांना सुखी ठेवण्यासाठी धडपडत असते. त्यामुळे चित्रपट, नाटक किंवा टी.व्ही.वर काम करतेच तीच अभिनेत्री असते असे नाही, तर प्रत्येक घरातील स्त्री ही खरी अभिनेत्री असते, असे मत अभिनेता स्वप्निल जोशीने व्यक्त केले. मंगळवार पेठ येथील भक्तिपूजानगर येथील शुभंकरोती हॉल येथे आज, शनिवारी ‘लोकमत’ सखी मंचतर्फे सखी सदस्यांसाठी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात आगामी प्रदर्शित होणाऱ्या ‘मितवा’ मराठी चित्रपटातील कलाकारांनी भेट दिली. त्यावेळी या कलाकारांनी सखी सदस्यांशी मुक्त संवाद साधला. ‘मितवा’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, गायिका जान्हवी प्रभू यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. स्वप्निल जोशीने ‘नमस्कार कोल्हापूर’, ‘दुनियादारी लय भारी’, ‘कोल्हापूरचा नाद खुळा’ असे म्हणत सखी सदस्यांशी संवाद साधला. यावेळी सखींनी जोरदार टाळ््या वाजवून त्यांलाही तितक्याच ताकदीने दाद दिली. मराठी चित्रपट आत कात टाकत असून मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक वळू लागले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटांचे बजेट वाढत आहे. आता मराठी कलाकारही चित्रपटांत हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसतात, तर हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटांचेही वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण होऊ लागले आहे. दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे म्हणाल्या, ‘मितवा’ ही म्युझिकल लव्ह स्टोरी असून, या चित्रपटाला शंकर, एहसान, लॉय या प्रतिभावान संगीतकारांचे संगीत लाभले आहे, तर अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या विशेष भूमिका आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाल्या, मी नेहमी हळदी-कुंकवाचा कार्यक्रमाला पाच ते सहा महिलाच असतात हे पाहिले होते. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने महिला येतात हे पाहून आश्चर्य वाटत आहे. गायिका जान्हवी प्रभू म्हणाल्या, चित्रपटातील ‘सत्यम-शिवम्-सुंदरम्’ हे गाणे खूप वेगळे आहे. हा चित्रपट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहांत जावून पाहावा, असे आवाहन ‘मितावा’च्या टीमने केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘डाएट बुक’चे प्रकाशन करण्यात आले. दरम्यान, संदेश गावंदे प्रस्तुत ‘स्वर ऋचा’ या मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला. ‘पाहिले न मी तुला...’, ‘ही गुलाबी हवा... वेड लागे जिवा...’, ‘या जन्मावर...’, ‘जीव रंगला...’ अशा गाण्यांना सखी मंत्रमुग्ध झाल्या, तर ‘डिपांग डिपांग...’, ‘राधा ही बावरी...’, ‘कधी तू...’ , ‘ही पोली साजूक....’ आणि ‘मला जावू द्या ना घरी, आता वाजले की बारा...’ या गाण्यांवर सखींनी मनमुराद ठेका धरला. यावेळी ऋचा गावंदे व सीताराम जाधव यांनी गाणी सादर केली, तर की बोर्ड साथ शिवाजी सुतार, अॅक्टो पॅडवर सचिन जाधव यांनी तर तबल्यावर संदेश गावंदे यांनी साथ दिली. महेंद्र कुलकर्णी यांनी निवेदन केले. याप्रसंगी अरुंधती महाडिक, शौमिका महाडिक यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली. याप्रसंगी शुभंकरोती सांस्कृतिक हॉलच्या संचालिका राजमती सावंत व अग्रवाल वन गोल्डचे संचालक सुशील अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुखदा आठले यांनी केले. यावेळी ‘लोकमत’ सखी मंच संयोजिका प्रिया दंडगे उपस्थित होत्या. याप्रसंगी सुमारे दोन हजार सखींनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.
प्रत्येक घरातील स्त्री अभिनेत्री
By admin | Updated: January 18, 2015 00:37 IST