कोल्हापूर : अद्ययावत नॅनो-फॉर्म्युलेशन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे हायस्पीड ओव्हरहेड स्टीरर हे उपकरण शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील संशोधकांसाठी उपलब्ध करून सेराफ्लक्स कंपनीने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक दायित्वाचे दर्शन घडविले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले. सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि., कोल्हापूरच्या वतीने शनिवारी शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीला संशोधन कार्यासाठी इका हायस्पीड ओव्हरहेड स्टीरर ‘युरोस्टार-२०’ हे उपकरण भेट दिले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सेराफ्लेक्स कंपनीच्या या देणगीमुळे नॅनोसायन्स विभागात नॅनोफॉर्म्युलेशनविषयक संशोधनाला गती मिळणार आहे. याच्याशी संबंधित संशोधनाबरोबरच तंत्रज्ञान हस्तांतरण उपक्रम राबवून त्यामध्ये अन्य अधिविभागांतील संशोधकांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील सखोल संशोधन विकसित करण्याच्या दिशेनेही प्रयत्न करावेत. येथील संशोधन हे जागतिक संशोधनाच्या तोडीचे किंबहुना अधिकाधिक सरस कसे होईल, या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. यावेळी सेराफ्लक्सचे संजीव तुंगतकर, संशोधन प्रकल्पप्रमुख डॉ. के.के. शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, एकनाथ घाडगे आदी उपस्थित हाेते.
शिवाजी विद्यापीठास ‘युरोस्टार-२०’ हे उपकरण भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST