इचलकरंजी : राज्यातील यंत्रमाग कामगारांसाठी यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची स्थापना करून त्यांना घरकुले, अपघाती नुकसानभरपाई, आरोग्य सेवा, मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती द्यावी. मंडळ स्थापन करण्यासाठी सुरुवातीला ५० कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा आणि सूत विक्रीवर प्रतिकिलो एक रुपया सेस बसवून मंडळासाठी निधी उभा करावा, अशा आशयाच्या शिफारशी करणारा अहवाल शासनाने नेमलेल्या समितीकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केला.असंघटित क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांच्या कल्याणासाठी अभ्यास करून शासनाकडे शिफारस अहवाल देणारी समिती तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी २ एप्रिल २०१३ रोजी स्थापन केली होती. राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांच्या अध्यक्षतेखालील पंधराजणांच्या समितीमध्ये आमदार प्रणिती शिंदे (सोलापूर), आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे (इचलकरंजी), आमदार सदाशिव पाटील (विटा), आमदार अब्दुलरशिद ताहीर मोमीन, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, दिलीप पाटील (इस्लामपूर), आदींचा समावेश होता. या समितीच्या गेल्या वर्षभरात सात बैठका झाल्या आणि हा शिफारस अहवाल तयार केला.यंत्रमाग कामगारांबरोबर कल्याण मंडळामध्ये कांडीवाला, जॉबर, वॉर्पिंग सायझिंग कामगार, आदींचा समावेश करावा. कामगार आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष असून, समितीमध्ये मालकांचे सात व कामगारांचे सात प्रतिनिधी राहतील. ग्रामीण विभागीय कामगार उपायुक्त हे समितीचे उपसचिव राहतील. प्रत्येक यंत्रमाग केंद्रामध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या समितीवर मालकांचा एक व कामगारांचा एक प्रतिनिधी घ्यावा. त्याचप्रमाणे कल्याण मंडळासाठी निधीची उपलब्धता सूत विक्रीतून प्रतिकिलो एक रुपया किंवा वॅटवर प्रतिकिलो एक रुपया याप्रमाणे करावी. ही वसुली शासनाच्या विक्रीकर खात्याने करावी.घरकुले देताना कामगाराला राजीव गांधी आवास योजनेचा लाभ द्यावा. शिष्यवृत्ती देण्यासाठी कामगारांच्या दोन पाल्यांकरिता इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत प्रतिमहिना २०० रुपयेप्रमाणे वार्षिक २४०० रुपये द्यावेत. उच्च शिक्षणाचा सर्व खर्च मंडळाने उचलावा, अशा शिफारशी या अहवालात केल्या आहेत. (प्रतिनिधी)
यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची स्थापना
By admin | Updated: July 3, 2014 00:54 IST