कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता आपल्याकडे असल्याने पक्षश्रेष्ठी आपलाच विचार करतील, अशी आशा वाटते. चुका काय सगळेच करतात. आतापर्यंत कॉँग्रेसविरोधात थेट कोठेही सहभागी झालेलो नाही; त्यामुळे माझ्या चुका गौण आहेत, असा निर्वाळा आमदार महादेवराव महाडिक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला. कॉँग्रेस श्रेष्ठी आपल्यावर अन्याय करणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाडिक यांचे उमेदवारीसाठी मुंंबई-दिल्लीत लॉबिंग सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘निवडून येण्याची क्षमता पाहूनच कॉँग्रेसश्रेष्ठी उमेदवारी देतील, यात शंकाच नाही. राजकारण व सामाजिक जीवनात चुका काय सगळ्यांकडूनच होतात. इतरही मंडळींवरही काही आरोप आहेत, त्यांनीही काही चुका केल्या आहेत. परमेश्वरसुध्दा चुकतो; त्यामुळे माणसांचे काय..? असा सवाल करीत या चुका गौण असतात. आम्ही कोणावर आरोप करणार नाही. त्या - त्यावेळची परिस्थिती पाहून राजकारणात निर्णय घेतले जातात. उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी योग्यच निर्णय देतील, ते माझ्यावर अन्याय करणार नाहीत, असा विश्वास आमदार महाडिक यांनी व्यक्त केला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे व आपण तिघे एकत्रितपणे जिल्ह्याचे राजकारण करत आहोत. पी. एन. व आवाडे यांनीही उमेदवारी मागितलेली आहे. प्रत्येकाची इच्छा असते, त्याप्रमाणे सर्वजण उमेदवारी मागतात आणि मागायलाही हवी. सर्वांनी एकमत करावे, अशा पक्षश्रेष्ठींच्या सूचना आहेत; पण राजकारणात एकमत होत नसते, असेही सूचक विधान आमदार महाडिक यांनी केले. पी. एन., आवाडे व आपण अशा एकत्रितपणे तिघांपैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचीही यापेक्षा वेगळी भूमिका नाही. मालोजीराजे, भरमूअण्णा पाटील, सत्यजित कदम यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर भूमिका मांडल्या आहेत, त्याचीही दखल घेतली जाईल, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले. ‘पी. एन.’ आणि मी एकच..! पी. एन. व आपण ‘गोकुळ’ दूध संघाच्या माध्यमातून जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहोत. त्यामुळे ‘पी. एन.’ आणि आपण दोन नाही, तर आम्ही दोघे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे महाडिक यांनी जाहीर करुन टाकले.
माझ्या पक्षविरोधातील चुका गौण
By admin | Updated: November 22, 2015 00:36 IST