राम मगदूम - गडहिंग्लजलोकनेते गोपीनाथ मुंडे यांची स्मृती जपण्यासाठी यंदापासून राज्यात दरवर्षी पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती आणि वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम या सप्ताहात राबविला जाणार आहे. दरवर्षी ३ ते ९ जून या कालावधीत हा सप्ताह संपूर्ण राज्यभर साजरा होईल.राज्याचे उपमुख्यमंत्री व केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री या नात्याने स्व. मुंडे यांनी देशाच्या व राज्याच्या विकासात भरीव योगदान दिले. त्यामुळे त्यांची आठवण कायम राहावी, यासाठीच लोकसहभागातून हा कृतिशील उपक्रम राबविला जाणार आहे.५ जून हा जगभर जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. त्यादिवशी पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती कार्यक्रम आणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून हा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.दरवर्षी या सप्ताहात होणाऱ्या वृक्ष लागवडीचा जिल्हानिहाय आढावा शासन घेणार आहे. त्यामध्ये ‘जलयुक्त शिवार’मधील गावांची संख्या, पर्यावरण सप्ताह आयोजित केलेल्या गावांची संख्या, लागवड केलेल्या रोपांची संख्या, त्यासाठी झालेला खर्च आणि निर्मित मनुष्यदिन, आदी बाबींचा समावेश आहे.या सप्ताहामध्ये म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जलयुक्तशिवार अभियानासाठी निवडण्यात आलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सप्ताहातील कार्यक्रमांच्या संनियंत्रणाची जबाबदारी विभागीय आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.याठिकाणी होणार वृक्षारोपणप्राथमिक / माध्यमिक शाळांची ठिकाणे, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, समाजमंदिर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन, शासकीय / निमशासकीय कार्यालये व रस्त्यांच्या दुतर्फा, इत्यादी ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी योग्य प्रतीच्या रोपांचा पुरवठा करण्याच्या सूचना सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान वनसंरक्षक तथा महासंचालकांना देण्यात आल्या आहेत.लोकप्रतिनिधींच्या हस्ते प्रारंभजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करावे. तसेच दरवर्षी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते दरवर्षी ३ जूनला किमान एका गावामध्ये पर्यावरण सप्ताहाचा प्रारंभ करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंडेंच्या स्मरणार्थ पर्यावरण सप्ताह
By admin | Updated: May 28, 2015 00:57 IST