कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले अंबाबाई मंदिराचे दरवाजे घटस्थापनेपासून उघडण्यात येणार असल्याने गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे यावर देवस्थान समितीचे नियोजन सुरू आहे. महाद्वार बंदच ठेवून पूर्व दरवाज्यातून भाविकांना प्रवेश व दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडायचे आणि घाटी दरवाजा वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवणार आहे. परस्थ भाविकांसाठी ऑनलाइन बुकिंगची सोय सुरू करण्यात येणार आहे.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दिवाळीत अंबाबाईसह सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली झाली, पाच महिन्यांनंतर दुसरी लाट आल्याने पून्हा एप्रिलमध्ये दरवाजे बंद झाले. पण शुक्रवारी रात्री राज्य शासनाने घटस्थापनेपासून सर्व मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिराची दारे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने देवस्थान समितीपुढे सोशल डिस्टन्सिंग राखून गर्दीचे नियोजन करण्याचे आव्हान आहे. ते कसे पार पाडायचे याचा विचार सुरू झाला आहे. महाद्वारमधून सर्वात जास्त गर्दी हाेते, त्यामुळे हा दरवाजा बंदच ठेवायचा. पूर्व दरवाज्यातून गाभारा दर्शनाची रांग जाते. येथून भाविकांना प्रवेश आणि दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडायचे, आणि घाटी दरवाजा वयोवृद्ध दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवायचा असा विचार सध्या सुरू आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर समितीने दर्शनाची कशी व्यवस्था केली याची माहितीदेखील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मागविली आहे. या दोन्ही पर्यायांचा विचार करून गर्दीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची वेळ बघून बैठक घेण्यात येणार आहे.
अंबाबाईचा नवरात्रोत्सव आणि दसरा साेहळा जगप्रसिद्ध आहे. याकाळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या २५ लाखांवर असते. पहिल्या दिवशी पहाटेपासून येथे भाविकांच्या रांगा लागतात. सुट्टीचा दिवस आणि अष्टमीला तर तोबा गर्दी असते. परस्थ भाविकांना त्यांच्या पुढील प्रवासाच्या नियोजनासाठी सोयीस्कर व्हावे यासाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यांना दर्शनासाठी ठरावीक वेळ दिली जाईल. ही रांग स्वतंत्र असेल. हे सगळे नियोजन असले तरी त्यावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
-----
मुखदर्शनाची सोय काय..
महाद्वारातून देवीचे मुखदर्शन घेणारा मोठा भाविक वर्ग आहे. येथून गरुड मंडपापर्यंत मुखदर्शन रांग सोडली जाते. त्यामुळे हा दरवाजाच बंद ठेवल्यास मुख दर्शनाची सोय कशी करणार हे कोडेच आहे. मुखदर्शन बंद झाल्यावर परत हा ताण मुख्य दर्शन रांगेवर वाढणार आहे.