कोल्हापूर : सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या आणि गोरगरीब, कष्टकरी जनतेचे हित हेच आपले हित मानून त्यांच्यासाठी चंदनाप्रमाणे झिजणाऱ्या माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुरगूड येथील शिवराज विद्यालयाच्या प्रांगणात शोकाकुल जनसागराच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्यासाठी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणाऱ्या या लढवय्या नेत्याला निरोप देताना जनसागरातील प्रत्येकाला आपल्या गळ्यात दाटून आलेला हुंदका आवरणे अशक्य झाले. महिलांचा आक्रोश तर मंडलिक यांच्यावरील नि:स्सीम भक्तीची साक्ष देऊन गेला. सदाशिवराव मंडलिक आज आपल्यात हयात नाहीत, यावर मुरगूड व कागल शहरातील प्रत्येक व्यक्ती विश्वास ठेवायला तयार नव्हती. त्यामुळे त्यांचे पार्थिव पाहताक्षणी प्रत्येकजण आपला हुंदका आणि अश्रूंना वाट मोकळी करून देताना पाहायला मिळाला. हजारोंचा जनसमुदाय तर केवळ नि:शब्द होऊन अंत्ययात्रेतून पुढे चालत होता. मंडलिकांच्या निधनाची वार्ता मुरगूड पंचक्रोशीत सोमवारी मध्यरात्रीच समजली होती, त्यामुळे मुरगूडकरांचा मंगळवारचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणूनच उजाडला. सकाळी सहा वाजल्यापासून हमीदवाडा कारखान्याकडून येणाऱ्या रस्त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. तब्बल अकरा तासांनी म्हणजे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मंडलिक यांचे पार्थिव घेऊन येणाऱ्या वाहनांचा काफिला गर्दीच्या दृष्टीस पडला आणि इतके तास दाबून ठेवलेला हुंदका आपसूक बाहेर पडला. अनेकांना शोक अनावर झाला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. मंडलिक यांच्या निवासस्थानी जमलेल्या महिलांच्या आक्रोशाने संपूर्ण वातावरण गदगदून गेले. पार्थिव घरी आणल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सर्व विधी आटोपले आणि लगेचच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या एका मोठ्या ट्रकवर मंडलिक यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. आपल्या नेत्याचे अंत्यदर्शन व्हावे यासाठी अबालवृद्ध धडपडत होते. कोणी उंच इमारतींवर, तर कोणी घरांच्या गॅलरीत उभे होते. काहीजण तर झाडांच्या फांद्या, पाण्याच्या टाक्यांवर उभे राहून अंत्ययात्रेत मंडलिक यांचे अंत्यदर्शन घेत होते. सुमारे वीस हजारांहून अधिक जनसमुदाय संथगतीने पुढे सरकत होता. निवासस्थान ते शिवराज विद्यालय हे अंतर दीड किलोमीटरचे असूनही अंत्ययात्रा पोहोचायला एक तास लागला. वाटेत अनेक महिला-पुरुष हातात फुले घेऊन उभे राहिले होते. अंत्ययात्रा मार्गावर अखंडपणे पुष्पवृष्टी होत होती. साडेसहा वाजता विद्यालयाच्या प्रांगणात अंत्ययात्रा पोहोचली. तत्पूर्वीच तेथेही मोठी गर्दी उसळली होती. शाळेच्या छतावरही लोक उभे होते. यावेळी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या मोठ्या चबुतऱ्यावर मंडलिक यांचे पार्थिव आल्यानंतर तर जनसमुदायाचा शोक अनावर झाला. ‘अमर रहे, अमर रहे, मंडलिकसाहेब अमर रहे’, ‘परत या, परत या, मंडलिकसाहेब परत या’ अशा घोषणांनी वातावरणातील दु:खाचा भार हलका केला. सूर्यास्तानंतर सायंकाळी सातच्या सुमारास शोकाकुल जनसमुदायाच्या साक्षीने सदाशिवराव मंडलिक यांच्या चितेला पुत्र संजय मंडलिक यांनी अग्नी दिला. साखर कारखाना शोकसागरातहमीदवाडा साखर कारखाना कार्यस्थळावर सव्वाचार वाजता मंडलिक यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी संपूर्ण कारखाना परिसर शोकसागरात बुडाला. मंडलिक जेव्हा जेव्हा कारखान्यावर येत असत त्यावेळी ते संपूर्ण कारखाना परिसर पायी फिरून पाहात असत. मंगळवारी तर त्यांचे पार्थिवच आले. त्यामुळे त्यांचे पार्थिव ठेवलेले वाहन ‘स्वर्गरथ’ कारखान्याच्या परिसरातून फिरविण्यात आले. या ठिकाणी प्रांताधिकारी मोनिका सिंह, तहसीलदार शांताराम सांगडे, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित उपस्थित होते.मुश्रीफांनी अश्रंूना वाट करून दिली सदाशिव मंडलिक व हसन मुश्रीफ यांचे नाते गुरु-शिष्याचे होते. राजकीय मतभेदांमुळे ते दोघे एकमेकांपासून दूर गेले असले तरी या दोघांमधील नात्याला मंगळवारी कंठ फुटला. कागलमधील खर्डेकर चौकात अंत्ययात्रा आली असता हसन मुश्रीफ मुंबईहून तेथे पोहोचले. त्यांनी वाहनावर चढून आपल्या एकेकाळच्या गुरूंचे अंत्यदर्शन घेतले, पुष्पचक्र वाहिले आणि त्यांचा कंठ दाटून आला. गलबललेल्या अवस्थेत मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांचे सांत्वन केले. मुश्रीफ खाली उतरले तेच डोळे पुसत. आपल्या नेत्याच्या जाण्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. गुरू-शिष्याची ही शेवटची भेट सर्वांचेच मन भेदून गेली. ..पालकमंत्र्यांनी घेतले अंत्यदर्शन कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, माजी मंत्री पतंगराव कदम यांनी कागल तालुक्यातील खडकेवाडा येथे मंडलिक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन शासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण केले. तसेच संजय मंडलिक यांचे सांत्वनही केले. मंडलिक यांच्या निधनाचे वृत्त कळताच मंगळवारी विशेष विमानाने पालक मंत्री पाटील, रावते व कदम दुपारी कोल्हापुरात आले. अंत्यदर्शन घेतल्यानंतर ते तातडीने मुंबईला गेले.
‘सदा’ संघर्षाची अखेर...
By admin | Updated: March 11, 2015 00:42 IST