कणकवली : जिल्ह्यातील छोट्या नगरपालिकांना ताकद देण्याची गरज आहे. या नगरपालिका संपूर्णपणे शासनाच्या निधीवर अवलंबून आहेत. नगरसेवकांनाही अधिकार नसून छोट्या नगरपालिकांना जास्त अधिकार देण्याबरोबरच जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत जयदेव कदम, विलास हडकर, प्रमोद रावराणे, आदी उपस्थित होते. काळसेकर म्हणाले की, जिल्ह्यातील विविध प्रश्न घेऊन माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, राजन म्हापसेकर, बाबा मोंडकर यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस आणि विविध खात्यांच्या मंत्र्यांंना भेटलो. ‘सी’वर्ल्ड हा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. लवकरच या पर्यटन विभागाचे अधिकारी परदेशी यांच्यासोबत प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणि भाजप पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीमधील कामांचे समान प्रमाणात भाजप-शिवसेनेला वाटप होणार आहे. पूर्ण राज्यात असाच फॉर्म्युला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी २२ जानेवारी रोजी वाळू व्यावसायिकांची लीज मुदतवाढ आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. माजी आमदार जठार, राजन तेली, विलास हडकर, संजय गावडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पारंपरिक मच्छिमार आणि मिनी पर्ससीननेट वादासंदर्भात पुढील महिन्यात स्वत: येऊन लक्ष घालण्याचे आश्वासन खडसे यांनी दिले आहे. पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे आशा स्वयंसेविकांचा प्रश्न मांडल्यानंतर तातडीने यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच सिंधु महोत्सवात ते उपस्थित राहणार असल्याचे काळसेकर यांनी सांगितले. जिल्हा नियोजनचा निधी वाढवून मिळावा, अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे केली आहे. देवगड प्रादेशिक नळयोजनेसाठी प्रस्तावित नगरपालिका असल्याने निधी उपलब्ध होऊ शकत नाही. मात्र, खास बाब म्हणून निधी देण्याचे आश्वासन मुनगुंटीवार यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)काम करणाऱ्यास प्राधान्यसदस्य नोंदणीच्या आधारे पक्षाची वाटचाल पुढे होणार आहे. भाजपची सदस्यता नोंदणी मोहीम चांगल्या प्रकारे सुरू आहे. जो कार्यकर्ता या मोहिमेत उत्तम काम करेल, त्याचा पदे वाटताना प्राधान्याने विचार केला जाईल. जिल्ह्यात भाजपला ८६ हजार मते मिळाली. दोन लाख सदस्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे काळसेकर यांनी सांगितले.
नगरपालिकांना सक्षम करा
By admin | Updated: January 20, 2015 23:37 IST