दरम्यान, दोन महिन्यांत पालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यातच शहरातील अतिक्रमण विषय, पाणी प्रश्नावरून लोकप्रतिनिधीविरोधातील आवाज अधिक घट्ट होत असल्याने लोकप्रतिनिधींची डोकेदुखी वाढली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारी नळ योजना जुनी असल्याने या जलवाहिनीला वारंवार गळती लागणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचे प्रकार वाढले आहेत. येथील आदर्श नगरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेकडे, लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त महिलांनी थेट पालिकाच गाठली. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबाबत गाऱ्हाणे मांडून संताप व्यक्त केला.
पाणीपुरवठा अधिकारी गैरहजर असल्याने कर्मचाऱ्यांनी महिलांची समजूत घालत दोन दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्याने महिला शांत झाल्या. यावेळी आदर्श नगरमधील स्नेहल तावदारे, सन्मती आलासे, शोभा बाबर, सुगंधा पवार, जयश्री हुन्नळे, रेखा तावदारे, रमेजा अपराध, सुशिली बनछोडे, पूजा चव्हाण, रेखा अडसूळ, गीता कारागीर, सुजाता माळी, विठ्ठल पवार, किरण मालगावे आदींची उपस्थिती होती.