कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांनी लाच स्वीकारल्याने कोल्हापूरच्या जनतेची मान शरमेने खाली गेली असून, त्याबद्दल एक जबाबदार नेता म्हणून मी जनतेची माफी मागतो, असे सांगतानाच माळवी यांनी यापुढे जनतेची अधिक थट्टा न करता येत्या आठ दिवसांत महापौरपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिला. आपणच निवडलेली व्यक्ती आपले ऐकत नाही हा आपला पराभव आहे, अशी कबुलीही मुश्रीफ यांनी दिली.जशी मी जनतेची माफी मागतो, तशीच कॉँग्रेसचे नेते सतेज पाटील व मालोजीराजे छत्रपती यांचीही दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी दिलेल्या ‘शब्दा’प्रमाणे सध्या महापालिकेत घडलेले नाही. मी शब्दाला पात्र राहू शकलो नाही. तरीही महापालिकेत ठरल्याप्रमाणे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी कायम असेल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. महापौर माळवी यांना महाडिक कुटुंबीयांपैकी कोणाचीही साथ नाही. मी व्यक्तिश: खासदार धनंजय महाडिक यांच्याशी बोललो आहे. माळवी यांना सत्ता सोडवत नाही, असा खुलासा मुश्रीफ यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्थायी समितीचे सभापती आदिल फरास, गटनेते राजेश लाटकर यांच्यासह पक्षाचे सर्वच नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी) एखादा पुरुष या पदावर असता तर...राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर आरोप होत आहेत म्हणूनच माळवी यांनी सत्तेची हाव सोडून पदाचा राजीनामा द्यावा, असे सांगून मुश्रीफ म्हणाले की, महापौरपदावर एखादा पुरुष असता, तर त्याला जाब विचारता आला असता; पण एक महिला असल्याने आम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे आमची त्यांना विनंती आहे की, २८ फे ब्रुवारीपर्यंत त्यांनी राजीनामा देऊन जनतेची थट्टा थांबबावी. सत्तेची हाव सोडावी, पक्षशिस्त पाळावी. तसेच होणारा अवमान त्यांनी स्वत:हून टाळावा.
राजीनामा न दिल्यास हकालपट्टी
By admin | Updated: February 20, 2015 23:09 IST