इचलकरंजी : विजेचे अतिरिक्त अनुदान रद्द केल्याने यंत्रमाग उद्योगास फटका बसला आहे. तरी यंत्रमाग उद्योगाचे अनुदान चालू करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.राज्यातील यंत्रमाग उद्योगासाठी पुन्हा अनुदान देण्यास २०५ कोटी रुपये लागतील. हे अनुदान पुन्हा सुरू करावे, ज्यामुळे यंत्रमाग उद्योगास ऊर्जितावस्था मिळेल, अशा आशयाचे एक निवेदन नागपूर येथे आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह यंत्रमाग केंद्रातील काही आमदारांनी दिले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील अनुदान दिल्याची माहिती आमदार हाळवणकर यांनी सांगितली.साधारणत: दोन वर्षांपूर्वी वीज निर्मितीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी महावितरण कंपनीने सर्व वीज ग्राहकांवर वीस टक्के वीज दरवाढ करण्याचा बोजा टाकला होता. त्याला राज्यभरातील सर्व वीज ग्राहकांनी विरोध केल्यामुळे कॉँग्रेसच्या आघाडी सरकारने नोव्हेंबर २०१३ पासून दरमहा ७०६ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला; पण नव्याने आलेल्या भाजप सरकारने अनुदान रद्द करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. सध्या मंदीच्या वातावरणातून मार्गक्रमण करीत असलेल्या यंत्रमाग उद्योगाला वीज दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. एकूणच यंत्रमाग उद्योग कोलमडण्याची भीती निर्माण झाल्याने राज्यातील यंत्रमाग केंद्रांमधील आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)यंत्रमाग उद्योगावरील वीज दरवाढीसाठी अनुदान देण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताना आमदार सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, आबू आझमी, आदी उपस्थित होते.
वीज दरवाढप्रश्नी बैठक
By admin | Updated: December 11, 2014 00:03 IST