कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ३ किंवा ४ नोव्हेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता ठळक झाली आहे. निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया ३० सप्टेंबरपासून सुरू करण्याचे आयोगाचे नियोजन आहे. त्यामुळे गणेशोत्सवात निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार नसल्याने तो दणक्यात साजरा होण्याची शक्यता आहे. इच्छुक मातब्बर उमेदवारांनी अजूनही आपले पत्ते न खोलण्यामागेही हेच महत्त्वाचे कारण आहे.राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याशी मंगळवारी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, कोणत्याही निवडणुकीची प्रक्रिया तीन टप्प्यांत राबविली जाते. त्यातील पहिला टप्पा प्रभाग रचनेचा असतो. त्यानुसार प्रभाग रचना ६ आॅगस्टला जाहीर झाली. त्यावरील हरकतींची सुनावणी २६ आॅगस्टला झाली. तिचा निकाल आठ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे; परंतु सध्याच्या प्रभाग रचनेत एखाद्या प्रभागाचा अपवाद वगळता फारसा बदल होणार नाही; त्यामुळे साधारणत: ९ सप्टेंबरपासून प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरू होत आहे. ते आठवडाभर चालेल. मतदारसंख्या निश्चित झाल्यानंतर त्यावरही हरकती स्वीकारल्या जातील. त्यासाठीची मुदत एक आठवडा असेल. याच दरम्यान गणेशोत्सव येत आहे. या उत्सवाच्या सुट्या असल्याने ही प्रक्रिया पूर्ण होण्यास सप्टेंबरअखेर उजाडू शकतो.साधारणत: ३० सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना लागू केल्यास त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होईल. अधिसूचनेनंतर निवडणुकीची प्रक्रिया तीस ते पस्तीस दिवसांतच पूर्ण केली जात असल्याने प्रत्यक्ष मतदान ३ किंवा ४ नोव्हेंबरला होईल, असा अंदाज आहे. त्याला निवडणूक आयोगाच्या सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे ४ ला मतदान, ६ नोव्हेंबरला मतमोजणी घेऊन दिवाळी झाल्यावर १६ किंवा १७ नोव्हेंबरला महापौर निवड घेता येऊ शकते. गणेशोत्सवानंतर ही प्रक्रिया सुरू होते व दिवाळीनंतर संपते. यंदा दिवाळी ७ नोव्हेंबरपासून सुरू होते. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची सध्या सुरू असलेली प्रक्रिया वेळेत व सुरळीत आहे. सभागृहाची मुदत १४ नोव्हेंबरला संपते. त्यापूर्वी किमान आठवडाभर नवे सभागृह अस्तित्वात यावे, असे आमचे नियोजन आहे. त्या हिशेबानेच आम्ही निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करू.- जे. एस. सहारियानिवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोगसंभाव्य कार्यक्रम असा प्रभागनिहाय मतदारयादीची प्रक्रिया : ९ सप्टेंबरपासून४या प्रक्रियेचा कालावधी : किमान आठ दिवस४त्यानंतर हरकती व निर्णय : २५ सप्टेंबरपर्यंत४प्रत्यक्ष अधिसूचना : ३० सप्टेंबरपासून४मतदान : ३ किंवा ४ नोव्हेंबर४मतमोजणी : ५ किंवा ६ नोव्हेंबर४महापौर निवडीची सभा : १६ किंवा १७ नोव्हेंबर(या संभाव्य तारखा निवडणूक आयोग व महापालिका अधिकारी यांच्याशी चर्चा करूनच दिल्या आहेत; परंतु तरीही त्यांमध्ये एक-दोन दिवसांचा इकडे-तिकडे फरक पडू शकतो.)
महापालिका निवडणूक चार नोव्हेंबरला शक्य
By admin | Updated: September 2, 2015 00:14 IST