कोल्हापूर : मौजे कडलगे (ता. गडहिंग्लज) येथील विनायक भीमराव कागीलकर (वय २१) या तरुणाचे अपॉहरण केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डे. बोचे यांनी आज, बुधवारी आठ आरोपींना सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. संशयित आरोपी चंद्रकांत मारुती नाईक (वय ३५), अन्वर आप्पासो कलावंत (३२), आक्काप्पा शांताराम नाईक (३९), सिदगोंडा रानाप्पा लिंगाजी ऊर्फ विभूती (३२), दस्तगीर आप्पासो कलावंत (३६), बसाप्पा चंद्रशेखर नाईक (३५), संजय सिद्धाप्पा नाईक (२२), रवींद्र आप्पासो नाईक (३१, सर्व रा. कडलगे, ता. गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत. मौजे कडलगे येथे विनायक कागीलकर हा लक्ष्मण जाधव यांच्याकडे कामास होता. डिसेंबर २०१२च्या कडलगे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्याने जाधव यांचा प्रचार केला. त्यामुळे संशयितांंनी त्याचे व्हॅनमधून अपहरण केले. त्या दरम्यान परशुराम जाधव व श्रीकांत धनगर हे विवाह समारंभातून परत येताना त्यांनी हा प्रकार पाहिला होता. त्या दिवशी तो घरी न आल्याने त्याची आई आक्काताई यांनी २४ डिसेंबर २०१२ रोजी गडहिंग्लज पोलिसांकडे मुलगा विनायक बेपत्ता झाल्याची वर्दी दिली. दुसऱ्या दिवशी संशयितांंनी विनायकचे अपहरण केल्याची माहिती जाधव व धनगर यांनी आक्कातार्इंना दिली. त्यानुसार गडहिंग्लज पोलिसांनी संशयितांना अटक केली. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी चंद्रकांत नाईक याने विनायकचा खून करून त्याचा मृतदेह मांगूर पुलावरून वेदगंगा नदीपात्रामध्ये फेकला. त्याने ते ठिकाण दाखविल्याने सदलगा पोलिसांना अनोळखी मृतदेह मिळाला होता. विनायकच्या आईने तो मृतदेह ओळखला. त्यानंतर अपहरण करून खून झाल्याचे निष्पन्न झाले. हा खून राजकीय वैमनस्यातून झाल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रकाश एम. हिलगे यांची नियुक्ती केली. खटल्याची सुनावणी गडहिंग्लज न्यायालयात सुरू होती; त्यानंतर खटला कोल्हापुरातील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे वर्ग केला. फिर्यादीतर्फे नऊ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी परशराम जाधव व श्रीकांत धनगर, आई आक्काताई यांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले. सरकारी वकील अॅड. हिलगे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून शिक्षा सुनावली. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपींची खुनाच्या गुन्ह्यामधून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्याबाबत उच्च न्यायालयात अपील करून सरकार पक्षाच्यावतीने दाद मागण्यात येणार आहे. - अॅड. प्रकाश हिलगे राजकीय वैमनस्यातून खून झाल्याने या खटल्याची सुनावणी ऐकण्यासाठी आरोपींचे नातेवाईक व कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात सकाळपासून मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. गर्दी पाहून लक्ष्मीपुरी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आरोपींना शिक्षा झाल्याचे समजताच महिलांनी आक्रोश करण्यास सुरुवात केली. जमिनीवर लोटांगण घालून कानडी भाषेत त्या फिर्यादी, साक्षीदार, पोलीस व वकिलांना शिवीगाळ करीत होत्या. वृत्तपत्राचे छायाचित्रकार फोटो घेण्यास पुढे गेले असता त्यांनी त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा गोंधळ पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना शांत केले. या गोंधळामुळे काही काळ न्यायालय परिसरात तणाव पसरला.
कडलगेतील आठ तरुणांना सक्तमजुरी
By admin | Updated: December 25, 2014 00:02 IST