कळे : भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर कळे येथील प्राथमिक शाळा ‘मॉडेल’ बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य सर्जेराव पाटील यांच्या प्रयत्नांतून सुरू असलेल्या केंद्र प्राथमिक शाळा, कुमार व कन्या विद्यामंदिर येथील शाळा इमारत व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील विकासकामांच्या आढावा कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवातीला जिल्हा परिषदेचे सदस्य सर्जेराव पाटील यांनी मनोगतामध्ये प्राथमिक शाळेत आवश्यक असलेल्या कपाउंड भिंत, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, व्यायामशाळा, पाण्याची सोय, सीसीटीव्ही कॅमेरे व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आंतररुग्ण विभाग, संगणक, शवविच्छेदन विभाग, नवीन प्रयोगशाळा व रिक्त पदे, आदी सुविधा पुरविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी केली. यावर अमन मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांकडे प्रस्ताव पाठविण्यास सांगून याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर शाळा मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी शाळेसंदर्भात माहिती घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सर्जेराव पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे, सहायक गटविकास अधिकारी एल. एस. सावंत, विस्तार अधिकारी पी. डी. भोसले, पी. के. गुरव, शाखा अभियंता व्ही. एस. तराळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्यानंद शिरोलीकर, मुख्याध्यापक बजरंग बुवा, अर्चना आकुर्डेकर, केंद्र समन्वयक विजय फासे, दीपक पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
कळे येथील प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकाम आढावाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे सदस्य सर्जेराव पाटील व अन्य मान्यवर.