वारणानगर : पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले असून, सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक लागलेल्या गावांत आता प्रचाराच्या चुरशीमुळे नेत्यांसह पॅनलप्रमुख आणि कार्यकर्त्यांची कसोटी लागत आहे. पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येची व सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पन्हाळा पूर्व भागातील कोडोलीसह सातवे, मोहरे, आरळे, केखले, पोखले आदी गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. पन्हाळा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर प्रचाराचा वेग वाढला आहे. गावगावात, वाड्यावस्त्यांवर उमेदवारांसह कार्यकर्ने प्रचारफेरीत सामील होत असून, पुरुष उमेदवारासह महिला उमेदवारदेखील प्रचारासाठी महिला
वर्गाबरोबर घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहे. त्यामुळे आता गावागावात प्रचार शिगेला पोहोचलेला दिसून येत आहे. पन्हाळ्यात आमदार डॉ. विनय कोरे गटाचे वर्चस्व आहे, शिवाय माजी आमदार पाटील-नरके गटाचेदेखील प्राबल्य आहे. या निवडणुकीत कोरे-पाटील गट एकत्रित असून, विरोधी माजी आमदार सत्यजित पाटील गटासह इतर अन्य पक्ष, संघटना व काही अपक्षांनी गावागावात निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्याने काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र आहे.
पन्हाळ्यातील सर्वांत लक्षवेधी निवडणूक असलेल्या कोडोली ग्रामपंचायतीसह सातवे, मोहरे, आरळे, केखले, पोखले, जाफळे आदी गावांत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. निवडणुकीतील उमेदवार, आपले नाव, फोटो निवडणूक निशाणी असलेले चिन्ह घरोघरी पोहोचवीत आहेत. गावागावात आता पॅनल प्रमुख आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गोळाबेरीज करताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सर्व आघाडी, अपक्ष उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे नेत्यांसह सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.