चंदगड : चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पुरेल इतके पाणी झांबरे, फाटकवाडी, जंगमहट्टी व इतर प्रकल्पामध्ये शिल्लक आहे, पण राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे पाटबंधारे विभागाने ताम्रपर्णी व घटप्रभा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी न अडवल्याने शेतकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसाने दगा दिल्याने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पुन्हा पाटबंधारे विभागाने दुष्काळात ढकलले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उपसभापती शांताराम पाटील यांनी स्वागत केले.पाटील म्हणाले, काजिर्णे, उचंगी, सर्फनाला, आंबेओहळ हे प्रकल्प १६ वर्षे झाले तरी अद्याप पूर्ण नाहीत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यासचंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील २० हजार एकर जमीन ओलिताखाली येईल, पण राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी विकासकामांची खोटी जाहिरातबाजी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत.लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या विकासकामात राजकारण करताना त्यांना वाचविण्याचे काम केले पाहिजे. केवळ रस्त्यावर दोन-चार बुट्या माती खडी टाकून विकास होत नाही, तर शेतकऱ्यांना जगवणे हे विकासाचे खरे काम आहे.पाटबंधारे विभागात पाणी अडवण्यासाठी लाकडी बरगे नाहीत ही हास्यास्पद बाब आहे. या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे कोट्यवधी लिटर पाणी कर्नाटकात वाहून जात आहे याला जबाबदार कोण? पाटबंधारे विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशीची मागणीही त्यांनी यावेळी केली.यावेळी माजी सरपंच विष्णू नाईक, उदयकुमार देशपांडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष मारूती कुट्रे, वसंत चव्हाण, राम पाटील, काँगे्रसचे युवक अध्यक्ष संदीप पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)तहसीलवर मोर्चाचे आयोजन---भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे शेतकरी वाचला तरच देश वाचेल. मात्र, चंदगड तालुक्यात पाटबंधारे विभागाच्या कृपेमुळे शेतकरीच देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी चंदगड तहसीलवर मोर्चाचे नियोजन केल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळाचे सावट
By admin | Updated: November 30, 2015 01:09 IST