चार महिन्यांत प्रभागातील बहुतांश कामे मंजूर करून त्याची चांगली सुरुवात करणाऱ्या व संपर्कामध्ये अग्रेसर असणाऱ्या नगरसेविका माधुरी नकाते यांचा प्रभागातील इतर भागांत मात्र सणासुदीच्या शुभेच्छा देण्यापुरताच संपर्क असल्याचे चित्र आहे. प्रभागातील प्रमुख समस्या आहे ती ड्रेनेजची. लाईन टाकून अनेक वर्षे झाली असली, तरी काही तांत्रिक कारणामुळे हे काम अडले आहे. त्यामुळे फक्त लाईन टाकून उपयोग काय? ते सुरू होणार कधी? अशी विचारणा येथील नागरिकांतून होत आहे. कामगार, मध्यमवर्गीय व उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या या प्रभागात संभाजीनगरसह गजानन महाराजनगर, कामगार चाळ, त्यागीनगर, ड्रायव्हर कॉलनी, तुळजाभवानी कॉलनी, गणेश कॉलनी, कृष्ण-कृष्णाई कॉलनी, पाटील वसाहत, चव्हाण कॉलनीतील पद्मावती हौसिंग सोसायटी, सिंधुनगरी कॉलनी, दत्त कॉलनी, आदी परिसर येतो.या प्रभागातील तत्कालीन नगरसेविका आशा बराले यांच्या निधनानंतर चार महिन्यांपूर्वी पोटनिवडणूक होऊन यामध्ये माधुरी किरण नकाते विजयी झाल्या होत्या. त्यानंतर सहा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी बहुतांश समस्या सोडविण्याचा प्र्रयत्न केला आहे. तरीही या प्रभागातील अनेक प्रश्न आहेत. तसेच असल्याचे चित्र आहे. रेसकोर्स नाका ते हॉकी स्टेडियम अशी ड्रेनेज लाईन करण्यात आली आहे; परंतु ही लाईन सिंधुनगरी येथे येऊन थांबली आहे. अवघ्या काही फुटांचा प्रश्न असून, ही जागा खासगी मालक व महापालिका यांच्या वादात न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. त्यामुळे ही लाईन पुढे नेता आलेली नसल्याने तिचा उपयोगच होत नाही. नगरसेविकांचा संपर्क चांगला आहे. सकाळी त्यांचे पती व दुपारनंतर स्वत: त्यांची या प्रभागात फेरी असते; परंतु पाटील वसाहत, कृष्ण-कृष्णाई कॉलनी या परिसरात फक्त सणाचे शुभेच्छापत्र देण्यापुरत्याच नगरसेविका येतात. त्यांना समस्यांविषयी सांगितल्यावर ऐकून घेऊन करतो म्हणून सांगतात व परत फिरकत नाहीत, अशी येथील नागरिकांची तक्रार आहे.या प्रभागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवत नसला, तरी संभाजीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने या ठिकाणी अधूनमधून पाण्याची समस्या निर्माण होते. प्रभागातील रस्त्यांची दुर्दशा आहे. काही ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. संभाजीनगर, गजानन महाराजनगर या भागांत स्वच्छता होत असली तरी पाटील वसाहत, कृष्ण-कृष्णाई कॉलनी, चव्हाण कॉलनी या भागांत अस्वच्छता, दुर्गंधी आणि रस्त्यांची समस्या आहे.तुंबलेल्या गटारींमुळे डासांचे साम्राज्य आहे. गतवर्षी या ठिकाणी डेंग्यूमुळे एक व्यक्ती दगावल्याचे सांगण्यात आले. पाटील वसाहतीनजीक असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांची स्थिती अस्वच्छतेमुळे वाईट झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही शौचालयांना दरवाजेच नाहीत. त्यातच हे मैलायुक्त पाणी थेट गटारीत सोडले जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना येथून नाक धरूनच जावे लागते. औषध फवारणी सोडाच, झाडलोट करण्यासाठीही आठवड्यातून एखादा कर्मचारी येतो व तो येऊन गेलेलाही कधी कळत नाही. ओढ्यावरील यल्लम्मा मंदिराशेजारील आशीर्वाद मंगल कार्यालयापर्यंतचा ‘नगरोत्थान’मधील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. वाहनांच्या रहदारीमुळे आसपासच्या घरांच्या भिंतींवर धुळीचे थरच साचलेले दिसतात. या धुळीमुळे आरोग्याचा प्रश्नही उद्भवू लागला आहे.सहा महिन्यांत मतदारसंघातील बहुतांश समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिला आहे. महापालिकेसह आमदार निधीतून रस्त्यासह विविध कामे मंजूर करून आणली असून, त्यांतील काही कामे सुरू असून काही पूर्णही झाली आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त स्वखर्चातून तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एक कर्मचारी स्वच्छतेसाठी, तर उर्वरित प्रभागाच्या देखरेखीसाठी आहेत. त्याचबरोबर प्रभागातील खुल्या जागा या महापालिकेच्या नावावर करण्याचे काम सुरू असून भविष्यात या ठिकाणी उद्याने, वाचनालये करण्याचा विचार आहे. - माधुरी किरण नकाते, नगरसेविका
प्रभागातील ड्रेनेज लाईन अपूर्ण
By admin | Updated: January 20, 2015 00:00 IST