कडगाव/वार्ताहर : वासनोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याला भले मोठे भगदाड पडल्याने धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे, तर सांडव्यातील माती, दगडगोटे वाहून जाऊन शेजारील शेत व विहिरी गाळाने बुजल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्य जलसंधारण विभागाने २०११ साली या धरणाच्या कामाला मंजुरी दिली होती. धरणाचे काम रखडत ठेवल्याने ७ कोटी रुपयांवरून तब्बल १४ कोटी रुपयांवर धरणाचा खर्च झाला, पण अद्यापही धरणाचे काम अपूर्ण स्थितीत आहे. धरणात ९९० घनमीटर पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट आहे. या धरणाचा लाभ वासनोली, तिरवडे, कडगाव पंचक्रोशीतील सुमारे हजार हेक्टर शेतीला होईल, या आशेने येथील शेतकऱ्यांनी धरण उभारण्यासाठी कवडीमोलाने जमिनी दिल्या आहेत.
धरणाची मुख्य भिंत बांधताना योग्य पद्धतीने बांधलेली नाही. सर्वेक्षण न करता सांडव्याची निवड केली गेली आहे. सांडव्याची उभारणी करताना बर्म केले नाहीत. पिचिंगचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले गेलेे. यामुळे धरणाचे भवितव्य धोक्यात असल्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद मोरे यांनी भुदरगड तहसीलदार कार्यालय, मृद व जलसंधारण विभाग कार्यालयासमोर उपोषण करून ठेकेदार व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळे हे धरण चांगलेच चर्चेत आले होते.
पहिल्याच पावसात धरणातील सांडवा तुटण्यास सुरुवात झाली होती. मात्र, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मुसळधार पावसात सांडवा तुटून जाऊन भले मोठे भगदाड पडले आहे. सांडव्यातील पाण्याने सुमारे ४० ते ४५ फूट खोल, ५० फूट रुंद व १०० फूट लांबीचे भले मोठे भगदाड पाडले आहे. या भगदाडातील शेकडो ट्रक माती व दगड वाहून जाऊन शेतामध्ये पडल्याने विहिरी बुजल्या आहेत, तर विलास पाटील, अशोक मुळीक, केरबा पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय पाटील, राजाराम पाटील, नारायण गुरव, विष्णू पाटील, सुरेश पाटील, धोंडिराम पाटील या शेतकऱ्यांचे मोटरपंप वाहून गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
चौकट
धरणाचा सांडवा तुटून भले मोठे भगदाड पडल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. हे भगदाड तातडीने दुरुस्त केले नाही तर वासनोली, तिरवडे, कडगाव गावांना धोका निर्माण होऊ शकतो.
फोटो : वासणोली धरणाचा सांडवा तुटून मोठे भगदाड पडले.