कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा पहिल्या टप्प्यातील विकास आराखडा जनतेसमोरील सादरीकरणानंतर निश्चित करण्यात येणार आहे. २३ जून रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात हा आराखडा जनतेसमोर सादर होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यामध्ये पुरातन वास्तू संवर्धन, पार्किंग सुविधा, पर्यटक सुविधा, इत्यादी कामांचा समावेश असल्याचे महापालिकेच्या नगर अभियंत्यांनी जाहीर केले आहे. फोट्रेस कंपनीने अंबाबाई मंदिराचा २५५ कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यातील पहिला टप्पा ७२ कोटींचा आहे. त्यापैकी सर्वांत आधी २५ कोटींची विकासकामे करण्यात येणार आहे. यात पार्किंग व्यवस्था, दर्शन मंडप, बिंदू चौक ते भवानी मंडप हेरिटेज वॉकचा समावेश आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हा आराखडा जनतेसमोर सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार २३ तारखेला आराखडा जनतेसमोर सादर होणार आहे. या सादरीकरणानंतर नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जाईल. तसेच यावेळी सूचनादेखील घेण्यात येणार आहेत. योग्य असलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून पहिल्या टप्प्यातील आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे व परिसर विकासकामांच्या सोमवारी (दि. ६) झालेल्या बैठकीत, लोकप्रतिनिधींनी सर्वसमावेशक व व्यापक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने या आराखड्याचे जाहीर सादरीकरण जनतेस करण्याची मागणी केली आहे. कारण नागरिक व भाविकांना या आराखड्याची माहिती होऊन सुविधांच्या आनुषंगिक सूचना करणे शक्य होईल. याबाबत चंद्रकांतदादा पाटील यांनी हा आराखडा जाहीर सादरीकरण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत. (प्रतिनिधी)
आराखडा २३ जूनला सादर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 00:14 IST