कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन झाल्याने अभ्यासक्रमांचे प्रवेश शुल्क, गुणपडताळणी, पदवीधर नोंदणी अशा विविध प्रक्रियांचे शुल्क व अर्ज भरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा सोमवारी गोंधळ उडाला. प्रवेशप्रक्रियेची सध्या धामधूम सुरू आहे. प्रवेश परीक्षा, विविध अभ्यासक्रम, गुणपडताळणी आदींचे अर्ज भरण्याची प्रक्रिया विद्यापीठाने आॅनलाईन केली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी विद्यापीठात कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. नेहमीप्रमाणे आजदेखील अशा स्वरूपातील गर्दी होती. मात्र, दुपारी अचानकपणे विद्यापीठातील सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरणे, प्रवेश शुल्क भरून घेण्याची प्रक्रिया थांबली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. आॅनलाईन सेवा सुरळीत होऊन प्रक्रिया पूर्ण करून जाण्यासाठी ग्रंथालय, मुख्य इमारती आदी ठिकाणी विद्यार्थी थांबून होते.दरम्यान, विद्यापीठातील डाटा सेंटर सर्व्हरच्या मेंटेनन्सचे काम आज सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होत असल्याने पुढील किमान ४८ तास विद्यापीठाची वेबसाइट, कॅम्पसवरील इंटरनेट सेवा तसेच अनुषंगिक आॅनलाईन सेवा बंद राहणार आहे. डाटा सेंटरच्या सर्व्हरच्या मेंटेनन्सबाबत आयबीएम कंपनीशी संपर्क साधण्यात आला होता.
‘सर्व्हर डाऊन’ने विद्यार्थ्यांचा गोंधळ
By admin | Updated: July 29, 2014 00:44 IST