कोल्हापूर : गेली अनेक वर्षे ‘गोकुळ’च्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केलेले ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे व स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या घराण्याने विरोधी आघाडीसोबत राहण्याचा घेतला तिथेच विजयाची पायाभरणी झाली होती. पाटील, डोंगळे व शशिकांत पाटील यांच्याकडील एकगठ्ठा मते सत्तांतर घडवून आणण्यात महत्त्वाची ठरली.
‘गोकुळ’मधील अंतर्गत राजकारणामुळे विश्वास पाटील, अरुण डोंगळे हे सत्तारूढ गटापासून दूर गेले. त्यांच्या बाहेर जाण्याला अनेक कंगोरे असले तरी नेत्यांनी केलेला अपमान या एकाच कारणाने त्यांनी फारकत घेतली. सुरुवातीच्या टप्प्यात आपणाला सोडून हे जाणार नाहीत, असाच काहीसा कयास नेत्यांचा झालेला होता. मात्र, सव्वा वर्षे शांत बसून निवडणुकीच्या तोंडावर उघड भूमिका घेतली. पाटील यांना पालकमंत्री सतेज पाटील तर डोंगे यांना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आघाडीत आणले. तरीही आपल्या आघाडीला फरक पडणार नाही, असे सत्तारूढ गटाला वाटत होते. डोंगळे यांची तर सत्ताधारी नेत्यांनी कुचेष्टाच केली. त्याला त्यांनी प्रथम क्रमांकाची मते घेऊन चोख प्रतित्तर दिले. मात्र, पाटील, डोंगळे यांनी गेल्या ३५-४० वर्षांत बांधलेली ठरावाची मोट सत्तारूढ आघाडीच्या पराभवाला कारणीभूत ठरली.
चाली ओळखून डाव परतवून लावण्यात यश
सत्तारूढ गटाचे प्रमुख शिलेदार असल्याने पाटील व डोंगळे यांना त्यांच्या राजकीय चाली माहिती होत्या. ते विरोधी आघाडीत आल्यानंतर त्या परतवून लावल्याच त्याचबरोबर निवडणूक कशा पद्धतीने हातात घ्यायची, याचे तंत्र विरोधी आघाडीच्या नेत्यांना दिले.
महाडिकांना सत्ता दिली आणि काढूनही घेतली -विश्वास पाटील
‘गोकुळ’मध्ये सत्तासंघर्ष नवीन नाही. १९८६ ला आपण संचालक म्हणून निवडून आलो. मात्र, १९८९ ला सत्ताधारी गटांतर्गत राजकारणात संचालक मंडळात महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील व अरुण नरके एका बाजूला तर आनंदराव पाटील-चुयेकर दुसऱ्या बाजूला राहिले. नरके व चुयेकर यांना सात-सात मते मिळाली आणि चुयेकर अध्यक्ष झाले. त्यानंतर १९९० ला आपण महाडिक-पाटील यांना साथ दिल्याने नरके अध्यक्ष झाले. बरोबर ३० वर्षांनी आपण महाडिकांची साथ सोडली आणि त्यांची सत्ता गेल्याचे ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी सांगितले.
संपूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी गेली दोन महिने प्रयत्न केले. व्यक्तिगत काही करत बसलो नाही, त्यात आपणाला जुन्या नेत्यांनी टार्गेट केल्याने आपल्या मताधिक्यात थोडी घट झाल्याचे पाटील यांनी सांगितले.