चंदगड : चंदगड तालुक्यासह इतर ठिकाणी आलेल्या संकटाच्या वेळी धावून येणारे व्यापारी म्हणून कोवाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची नावे घेतली जातात. मात्र, पावसाने या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची दैना झाली असून, त्यांच्याकडे कानाडोळा झाल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.
ताम्रपर्णी नदीच्या काठी कोवाडमध्ये मोठी बाजारपेठ वसलेली आहे. पंचक्रोशीतील २० ते २२ खेड्यांतील नागरिकांना ही बाजारपेठ मध्यवर्ती असल्यामुळे रोज लाखो रुपयांची उलाढाल होते.
चंदगड तालुक्यासह इतर ठिकाणी आपत्ती किंवा संकट आले की येथील व्यापारी वर्ग भरभरून मदत करायला मागेपुढे बघत नाही. पण, पुरामुळे हा व्यापारी वर्ग अडचणीत आला असताना त्यांची कुणालाच त्यांची आठवण होत नसल्याची खंत येथील व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. २०१९ ला महापुराच्या फटक्याने कोवाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे कंबरडेच मोडले होते. पण त्यातून सावरत असताना कोरोनाच्या महामारीमुळे तो कसाबसा उभा राहत असतानाच पुन्हा पुराने वेढल्यामुळे पुन्हा एकदा नुकसानीला सामोरे जावे लागले. २०१९ चा पुराचा अनुभव लक्षात घेऊन माणगाव ते कोवाड दरम्यान ताम्रपर्णी नदीतील गाळ काढावा. नदीपात्रातील झाडेझुडपे काढून खोली वाढवावी; जेणेकरून पुराचा फटका कमी बसेल, यासाठी आमदार राजेश पाटील यांच्याकडे निवेदनातून साकडे घालण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्षच झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या पदरात पुन्हा निराशाच पडली.
प्रतिक्रिया :
आमचे सर्व व्यापारी नेहमीच प्रामाणिकपणे व सचोटीने व्यापार करीत असतात. त्यामुळे अल्पावधीतच कोवाड बाजारपेठेला नावलौकिक मिळाला. मात्र, या व्यापाऱ्यांकडे फक्त देणगी आणि मदतीसाठी गळ घातली जाते. त्यांच्या गरजा व अडचणींना कोणीच वाली नाही.
- दयानंद सलाम, कोवाड व्यापारी संघटना अध्यक्ष.
फोटो ओळी : कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठेत ताम्रपर्णीचे नदीचे पाणी शिरल्याने अनेक दुकाने अशी पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
क्रमांक : २९०७२०२१-गड-०८