कोल्हापूर : नवीन बाळाला नवीन गाडीतून घेऊन येण्यास सांगणाऱ्या उत्तरेश्वर पेठेतील एका डॉक्टरला त्याच्या पत्नीच्या कसबा बावडा येथील माहेरच्या लोकांनी आज, मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घरात घुसून बेदम चोप दिला.संतापलेल्या लोकांनी घरातील प्रापंचिक साहित्याचीही तोडफोड केल्याची चर्चा शहरभर होती. दरम्यान, या प्रकाराची माहिती नसून याबाबत कोणतीही नोंद नसल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी, उत्तरेश्वर पेठेतील एका डॉक्टराची पत्नी बाळंतपणासाठी कसबा बावडा येथील माहेरी गेली आहे. ती बाळंतपणाहून परत सासरी येणार असल्याने पती डॉक्टरने तिच्या आई-वडिलांना नवीन बाळाला नव्या गाडीतून घेऊन येण्याचा तगादा लावला. जावयाच्या या हट्टाला कंटाळून माहेरचे लोक टेम्पो भरून उत्तरेश्वर पेठेत आले.याठिकाणी डॉक्टराला बेदम चोप देत त्याच्या घरातील प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. हा गोंधळ पाहून परिसरातील नागरिक जमा झाले. या घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु या प्रकरणात काही ज्येष्ठ व्यक्तींनी मध्यस्थी करीत हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ दिले नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही. (प्रतिनिधी)
डॉक्टर जावयाला उत्तरेश्वरमध्ये चोप--माहेरच्या लोकांचा उद्रेक
By admin | Updated: November 26, 2014 00:23 IST