कोल्हापूर : जोपर्यंत आपल्या घरात, कुटुंबात, आपल्या आजूबाजूला सर्व सुरळीत आणि सुखरूप असतं, तोपर्यंत माणसाचे आपला- तुपला, सख्खा - परका, गरीब -श्रीमंत असे जास्तीचे चोचले असतात; पण खरी वेळ आली की यातले काहीही कामी येत नाही, कामी येते ती फक्त माणुसकीच. त्यामुळे माणसुकी जपा आणि टिकवा, असे आवाहन प्रा. मधुकर पाटील यांनी केले. करवीरनगर वाचन मंदिर येथे रविवारी सायंकाळी श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे आयोजित व्याख्यानमालेत ‘माणुसकी हरवलेला समाज’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाभाऊ जोशी होते. पाटील म्हणाले, माणुसकी, नातेसंबंध, मैत्री या गोष्टी आता केवळ चित्रपट, कथाकादंबऱ्यांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत, असे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे. कारण माणूस माणुसकी विसरत चालला असल्याचा प्रत्यय आपल्याला जागोजागी येतो. नात्यांकडे पाहायला माणसे तयार नाहीत. सोशल नेटवर्किंगच्या युगात माणसांमधला संवाद कमी होत चालला आहे. संवादाच्या माध्यमाने क्रांती केली; मात्र एखाद्यावेळी रस्त्यावर अपघात झाला, तर अपघातग्रस्तांना मदतीला धाऊन न जाता, अपघाताचा फोटो पहिला कोण काढतो, यामध्येच आजच्या पिढीला धन्यता वाटते. पुढे पाटील म्हणाले, आज जगात माणसाची मूलभूत गरज अन्न, हवा आणि पाणी राहिली नसून, पैसा ही बनली आहे. पैशांपेक्षा श्रेष्ठ आणि मौल्यवान गोष्टी या जगात अनेक असून, त्यातील एक म्हणजे माणुसकी होय. पैसा मिळविण्याच्या नादात आपण स्वत:ची कर्तव्ये, सामाजिक जाणीव विसरत चाललो आहे. आपल्या घरात आपली काही माणसे राहतात याचे भानच आपल्याला उरले नाही. या गोष्टींमुळे आपली नाती तुटत चालली आहेत. माणसांनी पैसा कमवू नये असे नाही, जरूर कमवावा; मात्र पैसा कमविताना माणसुकी हरवू नये. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह राजू मेवेकरी यांनी स्वागत केले, तर नंदकुमार मराठे यांनी प्रास्ताविक केले. हीरकमहोत्सवी समितीचे गजानन नार्वेकर यांनी आभार मानले. राजेंद्र झुरळे, अनिल जाधव, दिनेश माळकर, संजय बावडेकर, ऋचा कुलकर्णी, किरण धर्माधिकारी, शिरीष कणेकर, ज्योती जाधव, शरद गोसावी, आदी उपस्थित होते.
पैसा कमविताना माणुसकी हरवू नये
By admin | Updated: April 13, 2015 00:07 IST