कोल्हापूर : आरोग्य विभागातील बदली, बढती, नियुक्तीत भ्रष्टाचार आणि नाहक त्रास दिल्यास शिवसेना स्टाईलने काम केले जाईल, असा इशारा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी दिला. कार्यालयातील ए.सी.मध्ये केवळ बसू नका; तर फिल्डवर जा, असा सल्लाही उपसंचालक रामचंद्र मुगडे यांना दिला.येथील शासकीय विश्रामगृहात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरोग्य उपसंचालक मुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री डॉ. सावंत म्हणाले, वरिष्ठांच्या अशा त्रासामुळेच वैद्यकीय अधिकारी नोकरी सोडून जात आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी कामकाजात सुधारणा करावी. ज्यांना हे जमत नसेल त्या वरिष्ठांनी राजीनामा देऊन जावे. कोणाचीही मस्ती खपवून घेतली जाणार नाही. आरोग्य उपसंचालक मुगडे यांनी ए.सी. केबिनमध्ये बसून अहवाल देण्याचे काम करू नये. फिल्डवर जाऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी. फिल्डवर भेटी दिल्याचा प्रत्येक आठवड्याचा अहवाल मला द्यावा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवाजी साठे यांच्याबद्दल तक्रारी आल्या आहेत. ते कार्यालयात फार कमी वेळ असतात, ‘सीपीआर’मधील स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत, अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. याकडे डॉ. साठेंनी लक्ष द्यावे. ‘सीपीआर’मधील रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी पाठपुरावा करावा. गणेशोत्सवावेळी १०८ या रुग्णसेवेची वाहने सांगली, कोल्हापूर, सातारा यादरम्यान ठेवावीत. आमदार चंद्रदीप नरके यांनी आवश्यक त्या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. आमदार सुजित मिणचेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यांच्यातील गैरसोयी मांडल्या. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाची माहिती दिली. सर्व लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव द्यावा...‘सीपीआर’मध्ये प्रचंड गैरसोयी आहेत. आरोग्य सेवा मिळत नाही, अशा तक्रारी आहेत; त्यामुळे उच्च वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाकडे ‘सीपीआर’चे व्यवस्थापन यावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव द्यावा, अशी सूचना डॉ. सावंत यांनी दिली.
केवळ ‘एसी’त बसू नका ! फिल्डवर जावा
By admin | Updated: August 19, 2015 00:17 IST