कोल्हापूर : आपण एका संघटनेचे पदाधिकारी आहोत, अशी चौकट स्वत:भोवती न बांधून घेता, यातून बाहेर पडून सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करा, आपोआप तुमच्या पाठीमागे लोक येतील. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता चळवळीच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचा, असे आवाहन महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केले. ताराबाई पार्क येथील विश्वेश्वरय्या हॉलमध्ये आज, मंगळवारी एस.टी. वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक) राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. छाजेड म्हणाले, केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे हक्क संपविण्याचा डाव आखला आहे. तसेच नव्या वाहतूक विधेयकामुळे एस. टी. महामंडळाचे खासगीकरण होऊन एस.टी.चे अस्तित्व संपणार आहे; तर एस.टी.चे कर्मचारी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे या कायद्याविरोधात तुम्ही जनजागृती करणे गरजेचे आहे. या कायद्याविरोधात लढा देण्यासाठी सज्ज राहा. या लढ्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये जनजागृती करा. तुम्ही एकत्र येऊन लढला तरच तुम्हाला न्याय मिळणार ही गोष्ट कामगारांना पटवून द्या. तसेच आगामी बँकेच्या निवडणुकीसाठी तयार रहा, असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. बैठकीस राज्याचे कार्याध्यक्ष मुकेश तिगोरे, सचिव डी. ए. लिपणे-पाटील, कोषाध्यक्ष सूर्याजी इंगळे, पुणेचे प्रादेशिक सचिव डी. पी. वनसोड, साताऱ्याचे विभागीय अध्यक्ष एस. के. भोसले, सिंधुदुर्ग प्रादेशिक सचिव एस. बी. रावराणे, एमएसईबी (इंटक)चे अध्यक्ष हिंदुराव पाटील, महाराष्ट्र राज्य इंटक विभागीय सचिव बंडोपंत वाडकर, आदी उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय कार्याध्यक्ष आप्पासाहेब साळोखे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. बैठक सकाळी साडेअकरा वाजत सुरू होऊनसुद्धा काही पदाधिकारी उशिरा आले. यावेळी छाजेड यांचा पारा चढला. ‘बैठक किती वाजता होती, तुम्ही किती वाजता आला? आम्ही तुमच्याकरिता लढतो आहे. किती वाजता येण्यास सांगितले होते? तुमचे गाव जवळच आहे. तुम्ही दहा वाजता आले पाहिजे होते,’ असे म्हणताच उशिरा आलेल्या पदाधिकाऱ्यांचा चेहरा पडला. कोल्हापूरचे विभागीय सचिव बंडोपत यांनी, आपले कोल्हापूरचे विभागीय कार्याध्यक्ष आप्पासाहेब साळोखे यांचे आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांसह अन्य संघटनांतील कार्यकर्त्यांसोबत चांगलेच संबंध आहेत, असे सांगताच त्यांना मध्येच थांबवत छाजेड यांनी, ‘तुम्ही सगळ्यांनीसुद्धा ‘आप्पां’सारखेच बनले पाहिजे,’ असा सल्ला दिला.
चौकटीत न राहता सर्वसमावेशक काम करा
By admin | Updated: December 10, 2014 00:30 IST