दीपक जाधव-कोल्हापूर
कदमवाडी-कोरोना लसीवरील संशोधन युद्धपातळीवर सुरू असल्याने शासनाकडून लसीकरणाची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्णावर उपचार करणारे डाॅक्टर कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणा व महापालिका याच्याकडून मागविली आहे.
लस प्रथम कोणाला दिली जाणार यावरून तर्क-विर्तक असले तरी सरकारकडून देशातील प्रत्येक जिल्ह्यातृून लसीकरणाचे नियोजन मागितले असून जिल्हा आरोग्य यंत्रणेने प्राथमिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात प्रत्येकापर्यंत लस पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. यासाठीच पहिल्यांदा कोरोनाकाळात काम केलेल्या योद्ध्यांना लस दिली जाणार आहे.
जिल्ह्यात सध्या ७६ प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका अधिकारी १२ असून ग्रामीण भागात २२७ खासगी दवाखाने व यामध्ये काम करणारे ११५६२ इतके आरोग्यसेवक असून शहरी भागात ११ नागरी आरोग्य केंद्र, सरकारी आरोग्य संस्था ४० व खासगी दवाखाने ३१२ असून यापैकी २९ दवाखाने बंद तर ५ दवाखान्यांनी लसीकरणाची गरज नसल्याची माहीती आरोग्य यंत्रणेला दिली आहे. शहरी भागात आरोग्यसेवक नाहीत परंतु सीपीआरमध्ये १४४२ आरोग्यसेवक असून महापालिकेकडे एकूण २७८ खासगी दवाखान्यांची माहिती तयार आहे.
----------‐------
अशी होणार साठणूक.
जिल्ह्यात लस साठवणुकीसाठी शीतसाखळी उपकरण ही प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सज्ज ठेवण्यात आली असून जिल्हात डिफ्रिजर १८२ असून आईस लाईन डिफ्रिजीरेटर १७० व कॅरियर बाॅक्स हे ४५०० सज्ज ठेवण्यात आले असून लस येण्याची वाट आरोग्य यंत्रणा बघत आहेत.
------------
कोट
कोरोना लसीकरणाबाबत शासनाकडून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी,डाॅक्टर, खासगी दवाखाने, नर्सिंग व मेडिकल कॉलेज यांना देण्यात येणाऱ्या लसीच्या साठवणुकीसाठी आवश्यक असणारी शीतयंत्रणा पुरेशा प्रमाणात तयार ठेवण्यात आली असून लसीकरणासाठी जिल्हा सज्ज आहे.
डाॅ.योगेश साळी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.
---------