कोल्हापूर : महसूल दिनाचे औचित्य साधून सर्व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसराची स्वच्छता करून स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी परिसर बनविण्याचा संदेश शनिवारी कृतीतून दिला. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शनिवारी सकाळी स्वत: हातात झाडू घेऊन परिसरातील स्वच्छतेला सुरुवात केली. त्यांच्यासमवेत अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख, रोजगार हमीच्या उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्यासह महसूल अधिकारी आणि कमर्चारीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच कार्यालय आणि परिसराची स्वच्छता जोपासणे आणि त्यात सातत्य ठेवणे काळाची गरज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, महसूल प्रशासनाच्यावतीने यापुढील काळात आठवड्यातून किमान एक तास कार्यालयीन तसेच परिसराच्या स्वच्छतेसाठी काढावा. जेणेकरून काम करतानाही आनंददायी व उत्साही वातावरण निर्माण होईल. सकाळच्या पहिल्या सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अधिकारी कमर्चाऱ्यांसह राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर चकाचक झाला. दिवसभर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात अंतर्गत स्वच्छतेची मोहीम राबवून कार्यालयातील अनावश्यक कचरा, धूळ या बाबी हातावेगळ्या करून आपापल्या कार्यालयाला स्वच्छतेचा नवा लूक दिला. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी केली झाडलोट
By admin | Updated: August 2, 2015 01:18 IST