लोकमत न्यूज नेटवर्क
पोर्ले तर्फ ठाणे : लाॅकडाऊनमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले. कोरोनात शेती व्यवसाय टिकून असला तरी शेतीमाल बाजार पेठेपर्यंत वेळेत पोहोचत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. दूध व्यवसायामुळे शेतकरी, शेतमजूर संसाराचा गाडा हाकत आहेत. कोरोनाने राज्यातील सर्व दवाखाने कर्जमुक्त झाले; परंतु कोरोनाग्रस्त कर्जबाजारी झाला आहे. विकासकामे करताना गटातटाचा विचार केलेला नाही. सामाजिक कामाला पहिले प्राधान्य देत असल्याची माहिती रयत क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिली.
पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर संवादयात्रा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी हितगुज केले. दरम्यान, शेतकरी शिवाजी शिंदे यांनी केंद्र सरकार उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करू पाहतंय ! असे विचारले असता. एफआरपी कायदा करण्यात आला असला तरी त्याबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत, असे खोत यांनी सांगितले.
याप्रसंगी उपसरपंच अरुण पाटील, राहुरी कृषी विद्यापीठाचे सिनेट सदस्य एन. डी. चौगुले आदींसह ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, रयत क्रांतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार जीवन खवरे यांनी मानले.