म्हाकवे : हळदी (ता. कागल) येथील बाजीराव मसू मगदूम यांची वारसा हक्काने असणारी मिळकत व पडसर जागा ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांनी व ग्रामसेवक यांनी दमदाटी करून अतिक्रमणाच्या नावाखाली काढून घेतली आहे.ही जागा संबंधित कुटुंबाला परत द्यावी, तसेच या जागेवर असणारे पत्र्याच्या शेडची झालेली १ लाख रुपयाची नुकसान भरपाई मिळावी आणि चुकीच्या पद्धतीने कामकाज करणाऱ्या येथील ग्रामसेवकाला निलंबित करून, ग्रामपंचायतही बरखास्त करावी, अन्यथा ५ आॅगस्टपासून कागल पंचायत समितीसमोर ‘आमरण उपोषण’ करण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाध्यक्ष व लिंगनूरचे उपसरपंच संभाजी यादव यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.असहाय्य कुटुंबावर अन्याय करून माणुसकीला काळिमा फासण्यात येत आहे. न्याय मिळण्यासाठी मंगळवार (दि. ५) पासून या उपोषणामध्ये मगदूम कुटुंबीयांसह यादव, तुळसीदास किल्लेदार ,कॉ. शिवाजी मगदूम सहभागी होणार आहेत.‘लोकमत’ने मांडले होते गाऱ्हाणेग्रामपंचायत सत्ताधारी मंडळी सत्तेच्या आणि बळाच्या जोरावर जर्जर आणि असह्य मगदूम कुटुंबीयांना पोलिसी खाक्या दाखवून ही जागा काढून घेत होते. यावेळी या कुटुंबातील त्रिवेणी ही प्रशासनाकडे आपल्याकडील लेखी पुरावे घेऊन दाद मागत होती. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे तिची कर्मकहाणी मांडत ‘बाशिंगाऐवजी तिची धडपड तोरणासाठी’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध केले. हे वृत्त पाहून किसान सभेने त्रिवेणीला न्याय मिळेपर्यंत पाळबळ देण्याचा निर्धार केला.
हळदी ग्रामपंचायत बरखास्त करा -‘लोकमत’ने मांडले होते गाऱ्हाणे
By admin | Updated: August 3, 2014 22:42 IST