शिवाजी सावंत /गारगोटी
भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघुपाटबंधारे प्रकल्प फुटला आणि प्रशासन जबाबदार म्हणत राजकीय पक्षांनी आक्रोश मोर्चा काढला; पण ‘सब गोलमाल है !’, ‘ये पब्लिक जाणती हैं !’ तलाव फुटल्यावर आमदार, खासदार, पालकमंत्री वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिल्यावर प्रशासन तेथील दगड हा क्वार्टझाइट असल्याचा निर्वाळा देत आहेत. जर हा दगड सच्छिद्र आणि खराब होता, तर तत्कालीन अधिकाऱ्यांनी ही जागा का नाकारली नाही? तलाव फुटताना दगड निखळून गेले असते. मुळात आउटलेटला असलेल्या गळतीमुळे तलाव फुटला. बांध तुटून गेल्यावर आउटलेटचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने प्रचंड प्रमाणात गळती लागल्याचे स्पष्ट दिसत असताना आता धरणाचा खडक चांगला नसल्याचा दावा करून भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न पाटबंधारे विभागाचे अधिकारी करीत आहेत. बांधाचे काम करताना त्याच्यावर दाब देऊन माती बसवलेली नाही, काळ्या मातीचा थर दिलेला नाही. हे आता स्पष्ट दिसते. यावरून तलाव हा निकृष्ट दर्जाचे काम केल्याने फुटला असल्याचे स्पष्ट होते. ठेकेदार काम करीत असताना हे अधिकारी, लोकप्रतिनिधी काय करीत होते? पदवीधारक असलेले अधिकारी एवढे निर्बुद्ध होते का ? त्यांना काम कोणत्या पद्धतीने सुरू आहे, हे समजत नव्हते का ? मग ते का गप्प बसले? अशी अनुत्तरित प्रश्नांची मालिका तयार होते.
या प्रश्नांची उकल शोधल्यास विकास काम मंजूर झाल्यापासून टक्का सुरू होतो, तो कोठे येऊन थांबतो ? हे सर्वांना माहीत आहे. अगदी १५ टक्क्यांपासून सुरू झालेली साखळी २७ टक्क्यांपर्यंत येऊन थांबते. ठेकेदार हा व्यावसायिक असल्यामुळे तो खिशातील पैसे घालून काम करणार नाही, हे उघड सत्य आहे. मग तो काम करताना नफा - तोट्याचा विचार करून काम करतो. अधिकारी याला पाठीशी घालतात. शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी या अधिकाऱ्यांना, ठेकेदाराला काहीही वाटत नाही का? लोकांच्या जीवन-मरणाशी संबंध असलेली कामे तरी चांगल्या पद्धतीने व्हावीत, अशी जनभावना आहे.
तलाव फुटला तरी तो दगड खराब असल्याने नव्हे तर दगडाच्या काळजाच्या टक्केवारी खाणाऱ्या अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामुळे फुटला आहे. लोक आता इतकेही अज्ञानी नाहीत की, त्यांना हा गोलमाल समजत नाही. लोक खूप हुशार आहेत त्यामुळे ‘ये पब्लिक है सब जाणती है’ की सगळा मामलाचा गोलमाल आहे.
या भागातील लोकांचे दैव बलवत्तर म्हणून हा तलाव रात्री फुटला. परिणामी जीवितहानी कमी प्रमाणात झाली. दिवसा फुटला असता तर मृतदेह कर्नाटकात शोधावे लागले असते, तेही शेकड्यांनी !
अधिकारी, ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा
या तलावाची तपासणी निष्पक्षपातीपणे होणे गरजेचे आहे. दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे आवश्यक असल्याची लोकमागणी जोर धरत आहे.