कोल्हापूर : रेखासम्राट टी. के. वडणगेकर आणि पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरू-शिष्य चित्रप्रदर्शनास शाहू स्मारक भवनातील कलादालन येथे रविवारी प्रारंभ झाला. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ इतिहास संशोधकडॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रकार के. आर. कुंभार होते. हे चित्रप्रदर्शन शनिवार (दि. २१)पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत खुले राहणार आहे. या चित्रप्रदर्शनात रेखासम्राट टी. वडणगेकर यांचे शिष्य विलास बकरे यांच्या निवडक चित्रकृतींचा आणि ‘कलासंस्कार’च्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रकृतींचा समावेश आहे. जलरंग, तैलरंग आणि अॅक्रॅलिकमध्ये निसर्गाच्या विविध छटा अफलातून बंदिस्त करण्यात आल्या आहेत. चित्रप्रदर्शन उद्घाटन समारंभानंतर पत्रकार व्यंकटेश स्मृती फौंडेशनतर्फे डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते पत्रकार अश्विनी टेंबे यांना युवा पत्रकार पुरस्कार देण्यात आला. विवेक चंदालिया यांना उपक्रमशील कलाशिक्षक पुरस्कार, तर पुरुषोत्तम सरनाईक आणि आनंदा देसाई यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे, दळवीज आर्टस् इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, रणजित माजगावकर, विजय टिपुगडे, सागर बकरे, उदय कुंभार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गुरु-शिष्य चित्रप्रदर्शनात सृजनशीलतेचा आविष्कार
By admin | Updated: March 16, 2015 00:04 IST