कोल्हापूर : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्दच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आदेशानुसार अंतर्गत कामकाजासाठी बँका, एटीएम आणि पोस्टाची कार्यालये बंद राहिल्याने सर्वसामान्य, व्यावसायिक अशा अनेकांची कोल्हापुरात बुधवारी गैरसोय झाली. पैसे काढणे अथवा भरणे बंद असल्याने विविध स्वरूपांतील व्यवहार ठप्प झाले. सुटे पैसे नसल्याने दैनंदिन व्यवहार करताना अनेकांची अडचण झाली. तसेच शंभरऐवजी भरावे लागलेले पाचशे रुपयांचे पेट्रोल, पाचशे रुपये सुटे करण्यासाठी करावी लागलेली तीनशे रुपयांची खरेदी अशा विविध पर्यायांवर दैनंदिन व्यवहार सुरू होते. पण, रोजच्या गर्दी आणि वर्दळीपेक्षा बाजारपेठेत काहीशी शांतता दिसून आली. पाचशे, हजार रुपयांच्या नोटा या पेट्रोल पंपावर स्वीकारल्या जात असल्याने शहरासह उपनगरांतील पंपांवर वाहनचालकांच्या रांगा लागल्या होत्या.पेट्रोल पंप, सरकारी रुग्णालये, औषध दुकाने, पोस्ट कार्यालये, आदी ठिकाणी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती नागरिकांना मंगळवारी विविध माध्यमांद्वारे मिळाली होती. त्यामुळे अनेकांची बुधवारची सुरुवात आपल्याकडील पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा सुट्या करून घेण्याच्या धावपळीने झाली. यात बहुतांश जणांनी पेट्रोल भरून पैसे सुटे करण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून शहर, उपनगरांमधील पेट्रोलपंपांवर वाहनचालकांची गर्दी होऊ लागली. अर्धा-एक तासात पंपाबाहेर वाहनधारकांच्या रांगा लागल्या. वाढत्या गर्दीमुळे सुटे पैसे देण्यावर पंपचालकांना मर्यादा आली. त्यावर काही पंपांवर जितके पेट्रोल तितकेच सुटे पैसे देण्याची विनंती करण्यात आली, तर अनेक पंपांवर पाचशे आणि एक हजार रुपयांचेच पेट्रोल-डिझेल देणे सुरू झाले. दुपारनंतर काही पंप बंद ठेवण्यात आले. याचा फटका नागरिकांना बसला. अनेकांनी केवळ सुटे पैसे, नोटा खपविण्यासाठी वाहनांच्या टाक्या गच्च भरून घेतल्या. काही ठिकाणच्या पंपांवर वादावादीचे प्रकार घडले. नोटा रद्दच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत कामकाजासाठी बँका, एटीएम सेंटर्स बंद होती. याबाबतचे फलक अनेक बँकांच्या दारात झळकत होते. ज्यांना याची माहिती नव्हती त्यांचा हेलपाटा झाला. सुटे पैसे नसल्याने व्यवहार करताना अनेकांची अडचण झाली. त्यातच बँका, एटीएम बंद असल्याने विविध स्वरूपांतील व्यवहारच ठप्प झाले. त्यामुळे बाजारपेठांमध्ये काहीसा शुकशुकाट होता.एस.टी.त दोन दिवस नोटा स्वीकारणारकोल्हापूर : काळा पैसा, नकली नोटा आणि अवैध व्यवहार रोखण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मंगळवारी मध्यरात्रीपासून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. यादरम्यान एस. टी. बसमध्ये प्रवाशांकडून ५०० व १००० रुपयांच्या नोटा शुक्रवारी (दि. ११) रात्री बारा वाजेपर्यंत स्वीकारण्याबाबत शासनातर्फे एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक आगारास आदेश देण्यात आला आहे. एस.टी. महामंडळातर्फे आॅनलाईन आरक्षण करण्यासाठी व प्रवासादरम्यान तिकीट काढण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या नोट स्वीकारल्या जात आहेत. मात्र काही वाहकांकडे सुट्या पैशांची अडचण आल्यास अन्य सहप्रवासी व त्यांच्यामध्ये तिकीट काढून याबाबतची गैरसोय दूर केली जात आहे.
गैरसोय, गोंधळ अन् व्यवहार ठप्प
By admin | Updated: November 10, 2016 00:13 IST