कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचा शुभारंभ होण्यापूर्वीच ढपल्यासह आर्थिक देवाण-घेवाण आरोपांच्या फैरी झडू लागल्या. वास्ताविक प्रशासकीय व राजकीय स्तरावर महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना अत्यंत पारदर्शकपणे राबविली जात असल्याचा अनुभव आहे. मात्र, योजनेबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्याने प्रशासनाने योजनेची सर्व माहिती पुन्हा संकेतस्थळावर दिली आहे. मात्र, दिवसभरात एकही नागरिक किंवा योजनेबाबत शंका उपस्थित करणारे जलअभियंता कार्यालयाकडे फिरकले नाहीत.शहरवासीयांचे तीन दशकांचे स्वप्न असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना अधिक सक्षम व पारदर्शकपणे व्हावी यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने योजनेबाबत सूचना घेण्याचे ठरविले. आज, गुरुवारी योजनेबाबत माहिती देण्यासाठी उपायुक्त संजय हेरवाडे व युनिटी कन्सलटन्सीचे नरेश नानोटकर दीड वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित होते. १७ व २४ जुलै या तीन दिवशी नागरिकांनी महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागात तोंडी अथवा लेखी सूचना देण्याचे आवाहन जलअभियंता मनिष पवार यांनी केले आहे. काळम्मावाडी योजनेची सर्व माहिती महापालिकेने यापूर्वीच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. योजनेत करण्यात आलेले तांत्रिक बदल व किमतीमध्ये झालेल्या फरकांसह योजनेची सर्व तांत्रिक बाबी, नकाशा, निविदा मंजुरीचा घटनाक्रम, सादरीकरण आदी माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. योजनेबाबत काही शंका असल्यास पाणीपुरवठा विभागाच्या शिवाजी मार्केट कार्यालयात वरील दिवशी सकाळी साडेदहा ते दीड वाजेपर्यंत त्या लेखी किंवा तोंडी स्वरूपात स्वीकारल्या जातात.
थेट पाईपलाईन संकेतस्थळावर
By admin | Updated: July 10, 2014 23:32 IST