म्हाकवे : साखर उद्योगाला बळ देणारा सहवीज प्रकल्प यापूर्वीच कार्यान्वित केला आहे. आपला कारखाना सदाशिवराव मंडलिक यांचे जिवंत स्मारक होण्यासाठी सर्वांचे मिळणारे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अपूर्ण असलेला प्रतिदिन ३० हजार लिटरहून अधिक क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पही येत्या गळीत हंगामापासून कार्यान्वित करणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक यांनी केली. यामुळे कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीसह शेतकऱ्यांना जादा ऊसदर देणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याची २५वी सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
विषय वाचन कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याच्या सभासद भागाची किंमत १० हजाराहून १५ हजार रुपये करणे, सन २०१७-१८ हंगामातील २४८ प्रमाणे काही शेतकऱ्यांची थकीत ऊसबिले, ऊस वाहतुकीचा दर वाढविणे, पूरबाधित उसाची तोड प्राधान्याने करणे, आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. चर्चेमध्ये गजानन चौगुले, सुनील देवडकर (म्हाकवे), आनंदराव पाटील (मळगे), जयसिंग भोसले, विश्वजित पाटील यांनी सहभाग घेतला.
यावेळी राजेखान जमादार, नामदेवराव मेंडके यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष बापूसाहेब भोसले, संचालक वीरेंद्र मंडलिक, आर. डी. पाटील, महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, शिवाजीराव इंगळे, शंकर पाटील, मारुतराव काळुगडे, मसू पाटील, शहाजी यादव, राजश्री चौगुले, विश्वास कुराडे, सर्जेराव पाटील, नंदकुमार घोरपडे यांसह मर्यादित शेतकरी, कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
पूरबाधित उसाचा स्वतंत्र तोडणी कार्यक्रम
यंदा वेदगंगा, दूधगंगा तसेच चिकोत्रा नदीकाठावरील उसाचे पुराने अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे हा ऊस लवकर गाळपाला आणण्यासाठी शेती विभागामार्फत बाधित क्षेत्राचा सर्व्हे केला आहे. त्याचा तोडणी कार्यक्रमही स्वतंत्रपणे राबविण्यात येणार असल्याचे कार्यकारी संचालक पाटील यांनी सांगितले.
फोटो ओळी
सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या २५व्या वार्षिक सभेत खासदार संजय मंडलिक यांनी संबोधित केले. यावेळी संचालक उपस्थित होते.
(छाया - जे के फोटो, सुरुपली)