ग्रामविकास मंत्रालयाने नुकतेच जिल्हा परिषद वर्ग तीन व चारच्या बदल्यांसंबंधी अधिसूचना जारी केली आहे. मात्र जिल्हा परिषद शिक्षकांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याने त्यांच्यासाठी वेगळी नियमावली तयार केली आहे. यासंबंधीच्या सूचनादेखील देण्यात आल्या असून, या बदलीच्या प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीसाठी वेगवेगळे भाग करण्यात आले आहेत. यामध्ये अवघड क्षेत्र, पती-पत्नी एकत्रीकरण हे दोन भाग असून, अवघड क्षेत्र भाग एकमध्ये विविध व्याधिग्रस्त शिक्षक त्यांना यातून सूट देण्यात आली आहे. याबरोबरच स्वातंत्र्यसैनिक यांची मुले-मुली, दिव्यांग शिक्षक यांचा समावेश आहे; तर यामध्येच जोडीदाराच्या व्याधीचाही समावेश करण्यात आलेला आहे. मात्र महिला शिक्षकांवर घरातील सासू-सासरे, मुले यांची जबाबदारी असते. त्यामुळे यांचाही समावेश भाग एकमध्ये करावा. जवळच्या ठिकाणी बदली झाली तर त्या संध्याकाळी घरी परत येतील, अशी सोय असलेल्या ठिकाणी बदली करण्यात यावी, असा सूर उमटत आहेत. तर पती-पत्नी एकत्रीकरण भाग दोनमध्ये सरकारी व जिल्हा परिषदेची नोकरी यांचा विचार केला आहे. मात्र सहकारी व खासगी क्षेत्रांतील नोकरी, शेती व्यवसाय यांचाही विचार केलेला नाही. त्यामुळे अशा जोडीदारांचाही विचार करून त्यांना सूट देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.