लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे मंडळांनी ऑनलाइन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्शन सुविधा उपलब्ध करून द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी दिले.
प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे आदेश होते; पण यामध्ये बदल करून गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध असेल, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी हा आदेश पाळणे गरजेचे आहे; पण प्रत्यक्षात उत्साही मंडळे आणि भक्त या आदेशाचे काटेकोरपणे पालन करतील की नाही, यावर शंका आहे.