कोल्हापूर : शहरवासीयांच्या नजरेत भरतील अशा विविध विकासकामांना प्रोत्साहन देणारे सुमारे १०८५ कोटींचे कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२१-२०२२ सालाचे नवीन अंदाजपत्रक प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी जाहीर केले. तत्पूर्वी झालेल्या वरिष्ठ अधिकारी तसेच विभागप्रमुख यांच्या बैठकीत अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रक तयार करताना शहरवासीयांना ते ‘आपले बजेट’ वाटेल, यावर प्रशासनाने अधिक जोर दिला आहे.
‘आपले बजेट’ तयार करताना शहरातील सामाजिक संस्था, व्यक्ती, व्यापारी संघटना, वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ यांच्याकडून अपेक्षा व सूचना मागविल्या होत्या. त्यांचा विचार या अंदाजपत्रकात करण्यात आला असून, प्रत्येक घटकासाठी काहीतरी सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
नवीन वर्षाच्या अंदाजपत्रकात अव्वल शिलकेसह महसुली व भांडवली अपेक्षित जमा ६२३ कोटी ४८ लाख इतकी धरण्यात आली असून, खर्च ६२१ कोटी ९६ लाख रुपये इतका अपेक्षित आहे. विशेष प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जमाखर्चाचे स्वतंत्र अंदाज तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये जमा ३९६ कोटी अपेक्षित असून, खर्च ३९० कोटी ४७ लाख इतका आहे. महिला व बालकल्याण निधी तसेच केंद्रीय वित्त आयोगांतर्गत ६५ कोटी ५१ लाख जमा अपेक्षित असून खर्च ६४ कोटी १७ लाख इतका अपेक्षित आहे. त्यामुळे एकूण महसुली, भांडवली, विशेष प्रकल्प व वित्त आयोग मिळून १०८५ कोटी ४८ लाख इतक्या जमेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.
१. महसुली जमा - (आकडे कोटींत)
- स्थानिक संस्था कर अनुदान - १७३
- मिळकत (घरफाळा) कर - ९९.६१
- मार्केट भाडे - ३१.७२
- इतर संकीर्ण जमा - ४०.५४
- शासकीय अनुदान - ३.८४
- नगररचना शुल्क - ३९.२३
- परवाना विभाग - ४.१५
- आरोग्य विभाग - २.५०
- पाणी हशील - ५७
- जललाभ कर - ३.२५
- महापालिका अर्थसाहाय्य - १.७०
२. महसुली खर्च - (आकडे कोटींत)
- आस्थापना, पेन्शन, मानधन - २७७.७०
- कार्यालयीन खर्च, देखभाल-दुरुस्ती - ७.३१
- सिंचन पाणीपट्टी - ४.००
- प्राथमिक शिक्षण - ३७.००
- रस्तेदुरुस्ती - ३.६५
- संगणकीकरण - ०.५५
- पाणी हशील तूटभरपाई - १.७०
- पाणीपुरवठा, ड्रेनेज देखभाल - ७.६५
- स्वनिधीतून भांडवलीकडे वर्ग - ४३.६०
- घनकचरा व्यवस्थापन - ००.०५
- विद्युत खर्च - ४०.६२
- इतर खर्च - ६७.१८
- पाईपलाईन देखभाल - १.४०
- हवा व पाणी प्रदूषण नियंत्रण - २५ कोटी
३. अंदाजपत्रकातील ठळक तरतुदी -
- महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधणे - १ कोटी
- हेरिटेज वास्तुसंवर्धन, पर्यटनस्थळे संवर्धन - १ कोटी
- शहरात मध्यवर्ती संदेश देणारी यंत्रणा उभी करणे - २० लाख
- हरितपट्टे, वने विकसित करणे - ४ कोटी ७० लाख
- उद्यान विकास करणे - ५० लाख
- आयटी पार्क विकसित करणे - १ कोटी
- कोटीतीर्थ तलाव पुनर्जीवित तसेच विकसित करणे - ३ कोटी ५० लाख
- हॉस्पिटल, प्रशासकीय इमारतीत अग्निशमन यंत्रणा बसविणे - ४० लाख
- इमारती दुरुस्ती करणे - ९० लाख
- शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणे, पट्टे मारणे - १ कोटी
- क्रीडाविषयक बाबींना प्रोत्साहन, स्पर्धा भरविणे - ३७ लाख
- सागरमाळ मैदान विकसित करणे - ८० लाख
- ई गव्हर्नन्स प्रकल्पातील अद्ययावत सुविधा वाढविणे - ४ कोटी
- फिरते दवाखाने, आरोग्य सुविधा श्रेणीत वाढ करणे - २० लाख
- महापालिका रुग्णालयांत सुविधांत वाढ करणे - १ कोटी ६० लाख
- फेरीवाला झोनमध्ये सुविधा देणे - २० लाख
- रस्ते, फूटपाथ, मॅनहोल, ग्रेड सेपरेशन सुविधा देणे - ५ कोटी ६० लाख
- घनकचरा व्यवस्थापन - १ कोटी ६० लाख
- पंचगंगा नदी प्रदूषण रोखणे - ६ कोटी ४० लाख
- प्रशासकीय इमारत बांधणे - ढोबळ तरतूद - १ कोटी ५० लाख
- अपारंपरिक ऊर्जास्रोत प्रकल्प राबविणे - ३० लाख
- केशवराव भोसले नाट्यगृह दुरुस्ती - २५ लाख
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अद्ययावत करणे - १ कोटी ५० लाख
-
- गळती शोध कार्यक्रम -
शहर पाणीपुरवठा विभागाकडील वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी तसेच पाणीगळती कमी करण्यासाठी गळती शोध कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याकरिता २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
- सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज -
केंद्र सरकारच्या सफाई कर्मचारी आयोगाकडून प्राप्त आदेशानुसार ड्रेनेज लाईन, सिवरलाईन, सेप्टिक टँक सफाई कर्मचाऱ्यांकरिता सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान राबविण्यात येणार असून, त्याकरिता ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
- हेल्थ कार्ड योजना -
महापालिका कर्मचारी, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने कर्मचारी हेल्थ कार्ड योजना राबविण्याचे ठरविण्यात आले असून, त्याकरिता १५ लाखांची तरतूद केली आहे.
‘करवीर दर्शन’ बस सुरू करणार -
केएमटीच्या माध्यमातून करवीर दर्शन बस सुरू करण्यात येणार असून त्याकरिता २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
भावी नगरसेवकांकरिता तरतूद -
सध्या महापालिकेत लोकनियुक्त सभागृहाचे अस्तित्व नाही. तरीही निवडणूक होऊन हे सभागृह अस्तित्वात येईल असे गृहीत धरून ८१ भावी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांकरिता प्रत्येकी पाच लाखांचे ऐच्छिक बजेट धरण्यात आले आहे; परंतु नंतर त्यात योग्य ते फेरबदल करून हा निधी वाढविला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.